संभाजी ब्रिगेडची सावरकरांवर टीका, भास्करराव जाधवांनी व्यासपीठावरच टोकलं…
संभाजी ब्रिगेडची सावरकरांवर टीका, मविआत मतभेद...
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्याबाबत केलेलं विधान आणि त्यावरून झालेला वाद ताजा असतानाच संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade) गंगाधर बनबरे यांनी सावरकरांच्या भूमिकेवर टीका करणारं विधान केलंय. त्यावर शिवसेनेच्या ठाकरेगटाची आक्रमक प्रतिक्रिया पाहायला मिळाली. ठाकरेगटाचे आमदार भास्करराव जाधव (Bhaskar Jadhav) यांनी त्याच व्यासपीठावरून बनबरे यांना प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे मविआत मतभेद निर्माण झाल्याचं बोललं जात आहे.
गंगाधर बनबरे यांचं विधान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा धर्म परिवर्तन केलं. तेव्हा सावरकरांनी एक लेख लिहिला. ‘बुद्धाच्या अतातायी अहिंसेचा शिरच्छेद’ हा लेख सावरकरांनी लिहिला होता. त्याला आंबेडकरांनीही उत्तर दिलं होतं, असं विधान बनबरेंनी केलंय.
भास्करराव जाधवांचं प्रत्युत्तर
गंगाधर बनबरे यांच्या भाषणावेळी भास्करराव जाधव त्याच व्यासपीठावर होते. त्यांनी तिथंच बनबरेंना टोकलं. आपली आघाडी आहे. पण काही मर्यादा आपण सगळ्यांनीच पाळायला हव्यात. सावरकर आणि आंबेडकर एकमेकांना काय बोलायचे तो अधिकार त्यांना होता. तो अधिकार आपल्याला असू शकत नाही. जरी आघाडी असेल तरी काही बाबींचं भान ठेवायला हवं, असं भास्करराव जाधव म्हणालेत.
बनबरे आणि भास्करराव जाधव यांच्यात व्यासपीठावरच झालेल्या खडाजंगीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होतेय. महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाल्याचंही बोललं जात आहे.