भास्कर जाधवांची नाराजी पार्ट टू, सभागृहातही शिवसेनेविरोधात आवाज
स्वतंत्र कोकण विद्यापीठाच्या मुद्द्यावरुन सध्या शिवसेनेच्या दोन नेत्यांमधील विसंवाद उघड झाला आहे. भास्कर जाधवांच्या नाराजी नाट्याचा आता पार्ट टू पाहायला मिळतोय.
रत्नागिरी : स्वतंत्र कोकण विद्यापीठाच्या मुद्द्यावरुन सध्या शिवसेनेच्या दोन नेत्यांमधील विसंवाद उघड झाला आहे. भास्कर जाधवांच्या नाराजी नाट्याचा आता पार्ट टू पाहायला मिळतोय (Bhaskar Jadhav on Kokan University). उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कोकणासाठीच्या स्वतंत्र विद्यापीठासाठी कमिटी नेमल्याचं जाहिर केलं. मात्र, यावर भास्कर जाधव यांनी थेट विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित करुन सामंत यांना चितपट केलं. जाधव यांच्या प्रश्नावर उत्तर देताना सावंत यांनी अशी कोणतीही समिती स्थापन केली नसल्याचं स्पष्ट करण्याची नामुष्की आली.
कोकणासाठी स्वंतत्र विद्यापीठावरून सध्या कोकणात राजकीय शिमगा सुरु झालाय. बरं हा राजकीय शिमगा शिवसेनेतील दोन नेत्यांमध्ये सुरु झालाय. राष्ट्रवादीत असल्यापासून उदय सामंत आणि भास्कर जाधव यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. राष्ट्रवादीचीच रीघ आता शिवसेनेत आल्यानंतरही पुढे कायम असल्याचं पाहायला मिळतंय. मंत्रीपद न मिळाल्याने भास्कर जाधव सध्या नाराज आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात राजशिष्ठाचार पाळला गेला नाही म्हणून भास्कर जाधवांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता त्यांच्या याच नाराजी नाट्याचा ‘पार्ट टू’ कोकण विद्यापीठाच्या मुद्द्यावरुन पाहायला मिळतोय.
कोकणासाठीच्या स्वतंत्र विद्यापीठाच्या मुद्द्यावरुन कोकणासाठी स्वंतंत्र विद्यापीठ हवं ही मागणी तशी जुनी आहे. यावर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतानी विद्यापीठासाठी आपण पुढाकार घेतल्याचं दाखवत या विद्यापीठासाठी स्वतंत्र समिती स्थापन करत असल्याचं सांगितलं. कोकणातील वृत्तपत्रांमधून याबाबत बातम्याही झळकल्या. यानंतर आता कोकणासाठी स्वंतत्र विद्यापीठ महत्त्वाचं असल्याची मतं नागरिकांमधूनही व्यक्त केली जात आहेत.
उदय सामंत यांनी समिती स्थापन करत असल्याची घोषणा केली, मात्र भास्कर जाधव यांनी राजकीय खेळी करत सामंत यांना विधानसभेतच उघडं पाडलं. जाधव यांनी मुंबईत सुरु असलेल्या अधिवेशनात याच संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला. याला उत्तर देताना सामंत यांच्यावर कोकणाच्या स्वंतत्र विद्यापीठासाठी कोणतीही समिती स्थापन झाली नाही असं सांगण्याची नामुष्की ओढावली. त्यामुळे या मुद्द्यावर जाधव यांनी सामंत यांना थेट विधीमंडळात चिटपट केल्याचं पाहायला मिळालं.
Bhaskar Jadhav on Kokan University