उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा कधी करणार?; भास्कर जाधव यांनी स्पष्टपणे सांगितलं…
Bhaskarrao Jadhav on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा अन् ठाकरे गटाची पुढची भूमिका; भास्करराव जाधव यांनी स्पष्ट भूमिका मांडली
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर भाष्य केलंय. तसंच सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं आहे. उद्धवसाहेबांनी महाराष्ट्र दौरा करावा. अशा प्रकारचा आम्ही आग्रह करण्यापेक्षा उद्धवसाहेब गेली अनेक महिने मला महाराष्ट्रामध्ये फिरायचं आहे असं सातत्याने सांगत आहेत. परंतु मध्यंतरी पाऊसच नव्हता आता पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे. त्यामुळे उद्धवसाहेब महाराष्ट्राच्या दौऱ्यावर लवकरच बाहेर पडतील असं मला वाटतं, असं भास्कर जाधव म्हणालेत.
ठाकरे गट एकला चलो रे च्या भूमिकेत आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा सध्या आम्ही महाविकास आघाडीत आहोत. अशा प्रकारचा कोणताही विचार कोणतीही चर्चा आमच्यात झालेली नाही. पुसटसा सुद्धा उल्लेख या ठिकाणी कुणी केलेला नाही. आम्ही सगळे सोबत आहोत, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
भारतीय जनता पार्टीकडून आमच्यामध्ये फूट पाडण्याचं काम सुरू आहे. आमच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण होण्याकरता प्रयत्न करत आहे. स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्याकरता म्हणून भारतीय जनता पार्टी अशा प्रकारच्या अफवा या पसरवत आहे, असं म्हणत भास्कर जाधव यांनी टीकास्त्र डागलं आहे.
सध्या लोकांचा भारतीय जनता पार्टीवर कोणताही विश्वास राहिलेला नाही. त्यांचे राजकीय डावपेच सगळ्यांच्या लक्षात आले आहेत. जनता त्यांना माफ करणार नाही, असंही ते म्हणालेत.
समान नागरी कायदा देशात लागू होण्याची शक्यता आहे. त्यावर भास्कर जाधव बोलले आहेत. या मसुद्यामध्ये नक्की काय आहे समान नागरी कायदा म्हणजे त्याच्यामध्ये कोण कोणत्या धर्मावर कोणकोणत्या समाजावर आघात होणार आहे. न्याय मिळणार आहे की अन्याय होणार आहे. हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणे योग्य नाही, असं ते म्हणालेत.
भारतीय जनता पार्टीला ज्या पद्धतीने 35 वर्ष राम मंदिराचा मुद्दा फक्त आणि फक्त त्या ठिकाणी दोन समाजामध्ये वाद करण्याकरता म्हणून त्यांनी तो सातत्याने तापत ठेवला. त्याच पद्धतीने समान नागरी कायदा विषय निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी उपस्थित करून त्यांनी 2024 ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा विषय समोर आणला असा आमचं ठाम मत झालंय, असं घणाघात जाधव यांनी केला आहे.