शिवसेना-भाजपची डोकेदुखी वाढली, दोन मतदारसंघात बंडखोरी
नाशिक : बंडखोरांमुळे शिवसेना-भाजप युतीची डोकेदुखी वाढणार आहे. नाशिक आणि शिर्डी मतदारसंघात बंडखोरी रोखण्यात भाजपला अपयश आलंय. शिर्डी मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 8 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तब्बल 20 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर नाशिकमध्येही भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी त्यांचा अपक्ष म्हणून अर्ज कायम ठेवलाय. शिर्डीत भाजपचे बंडखोर भाऊसाहेब राजाराम […]
नाशिक : बंडखोरांमुळे शिवसेना-भाजप युतीची डोकेदुखी वाढणार आहे. नाशिक आणि शिर्डी मतदारसंघात बंडखोरी रोखण्यात भाजपला अपयश आलंय. शिर्डी मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 8 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तब्बल 20 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर नाशिकमध्येही भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी त्यांचा अपक्ष म्हणून अर्ज कायम ठेवलाय.
शिर्डीत भाजपचे बंडखोर भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांनी अर्ज मागे न घेतल्याने भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांची डोकेदुखी वाढली आहे. पक्ष नेतृत्वाने वाकचौरे यांचा अर्ज माघारी घेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यात अपयश आलं. त्यामुळे शिर्डीत आता पंचरंगी लढत होणार असल्याचं चित्र दिसून येतंय.
युती झाल्याने भाजपकडून इच्छुक असलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची पंचायत झाली होती. सध्या भाऊसाहेब वाकचौरे भाजपमध्ये असून भाजप कोट्यातून ते साईबाबा संस्थानचे विश्वस्त आहेत. शिवसेनेकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी घोषित झाल्याने वाकचौरे यांनी बंडाचं निशाण फडकावत अपक्ष उमेदवारी दाखल केली.
अर्ज माघारी घेण्यासाठी शेवटच्या मिनिटापर्यंत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून दबाव सुरू होता. मात्र वाकचौरेंचं बंड पक्षश्रेष्ठींना थांबवण्यात अपयश आलं. आता शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांची डोकेदुखी वाढली आहे. तर नगर दक्षिणेतही भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांचीही मोठी अडचण झाली आहे. भाजपने युतीधर्म पाळला नसल्याने शिवसेना आता नगर दक्षिणेत काय भूमिका घेते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
शिर्डीमध्ये एकूण 20 उमेदवार रिंगणात असून यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे भाऊसाहेब कांबळे , शिवसेनेचे सदाशिव लोखंडे, वंचित बहुजन आघाडीचे संजय सुखदान, भाकपाकडून बन्सी सातपुते आणि अपक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात लढत होणार असल्याचं चित्र आहे.
नाशिकमध्ये माणिकराव कोकाटेंची बंडखोरी
भाजपचे संकटमोचक असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांना त्यांच्याच विभागातील बंडखोरी रोखण्यात अपयश आलंय. माणिकराव कोकाटे यांनी त्यांचा अपक्ष म्हणून अर्ज कायम ठेवलाय. नुकतीच त्यांनी जाहीर सभा घेऊन भूमिका स्पष्ट केली होती. नाशिकची जागा शिवसेनेकडे असल्याने विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे उमेदवार आहेत. तर राष्ट्रवादीकडून माजी खासदार समीर भुजबळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.