भुजबळांना गोळी मारली जाईल, इनपूट आलंय; छगन भुजबळ यांचा विधानसभेत धक्कादायक गौप्यस्फोट
सारथीला जेवढे दिले ते इतरांनाही द्या. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला पैसे दिले, तसे इतरांनाही द्या. इतर मागासवर्गीयांना हजार कोटीही दिले नाही. त्यांनाही द्या. यांनाही द्या, एवढच म्हणणं आहे. आर्थिक दुर्बल घटकासाठी 10 टक्के आरक्षण लागू करण्यात आलं आहे. त्यात 75 टक्क्यांपेक्षा अधिक नोकऱ्यात मराठा समाजाला आरक्षण मिळालं. लोकसेवा आयोगाने 650 नियुक्त्या केल्या. त्यात 95 टक्के मराठा समाज आहे. आनंद आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.
विनायक डावरुंग, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 13 डिसेंबर 2023 : कालपासून अचानक माझ्या घरी सुरक्षा वाढवली आहे. मी पोलिसांना विचारलं काय गडबड आहे? पोलीस म्हणाले, साहेब वरून इनपूट आलंय. भुजबळांना गोळी मारली जाईल… रिपोर्ट आहे, अशी धक्कादायक माहिती देतानाच मी मरायलाही तयार आहे. मराठ्यांना आरक्षण द्या आणि ही झुंडशाही थांबवा, एवढंच माझं म्हणणं आहे. आज भुजबळ असतील. उद्या दुसरं कोणी असेल. आपण गप्प बसणार आहात का? कोणी बोलणार नाही? धिक्कार करणार नाही? निषेध करणार नाही. आपण फक्त पाहणार का? हाच आज माझा महाराष्ट्राला हा प्रश्न आहे, असं राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले. छगन भुजबळ यांनी विधानसभेत हा धक्कादायक गौप्यस्फोट केला.
आमच्या हातात दंडूके आहेत, सरकारला पायाखाली तुडवू शकतो. भुजबळांनाही पाहून घेऊ. एकदा आरक्षण मिळू द्या भुजबळांचा कार्यक्रमच करतो, अशी विधाने केली जात आहे. 24 डिसेंबरला नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी, भुजबळ फॉर्म ज्यांना पाहायचं त्यांनी नावे कळवावी, असे मेसेज व्हायरल होत आहेत. म्हणजे माझ्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू झाली आहे. हल्ला होणारच आहे. प्रकाश सोळंकेंवर झाला, संदीप क्षीरसागरवर झाला, कोण जायला तयार नाही. आमच्यावरही होईल. कुणी यावं ही अपेक्षा नाही. जे व्हायचं ते होईल, असं छगन भुजबळ म्हणाले. छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून आपली भूमिका स्पष्ट केली.
मलाच टार्गेट केलं जातंय
भुजबळ मराठा आरक्षण विरोधक आहेत, अशी प्रतिमा केली जात आहे. या सभागृहात मराठा आरक्षणाबाबत कायदे झाले. दोनदा मी समर्थन केलं. आरक्षण त्यांना द्या असं म्हटलं. पण वेगळं द्या असं माझं मत आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या. याला कुणाचा विरोध आहे? काँग्रेसचा नाही, शरद पवार यांचा नाही. इतरांचाही नाही. मी तेच सांगतो. सर्व तेच म्हणत आहेत. पण मलाच टार्गेट केलं जात आहे. मी काय विरुद्ध बोललो? मलाच टार्गेट का केलं जातं आहे? असा सवाल भुजबळ यांनी केला.
आता म्हणतात बाहेर काढा
बाळासाहेब सराटे हायकोर्टात गेले आहेत. ओबीसी आरक्षणातील इतर ओबीसींना वगळण्याची त्यांनी मागणी केली आहे. इतरांची भरती बेकायदेशीर असून ही खोगीर भरती आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावेळी नेहरूंनी राज्यांना अधिकार दिले. आरक्षणात तुम्हाला ज्यांना घ्यायचं त्यांना घ्या म्हणून सांगितलं. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी बीडी देशमुख समिती नेमली. त्यानंतर ओबीसींना आरक्षण दिलं. पण आता हे म्हणतात या सर्वांना बाहेर काढा, अशी व्यथा भुजबळ यांनी मांडली.
राखरांगोळी काय हे कळलं
राज्यात अशांततेचं वातावरण आहे. कुणी केलं? मी केलं? दोन महिने त्यांचं चाललं होतं. ए भुजबळ तुला आरक्षण घेऊनच दाखवेल. मी शांत होतो. बोल बोल बोलले. फक्त भुजबळ एके भुजबळ. तुम्हाला काय सांगायचं? तुम्ही वाचू शकणार नाही एवढ्या घाणेरड्या शिव्या मला दिल्या. मेसेज केले. आम्ही तक्रार केली. काहीच झालं नाही. तेव्हाही मी गप्प. पण जेव्हा बीड पेटलं, आमदारांची घरं पेटली. कोड नंबर देऊन हल्ले करण्यात आली. त्यानंतर मी बोललो. राखरांगोळी म्हणजे काय असते हे मला जळालेलं हॉटेल पाहून कळलं. तरीही म्हणतात भुजबळ अशांतता करतात. मी या हॉटेल आणि घरांची पाहणी केली. त्यावेळी मला राहवलं नाही, म्हणून मी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली, असं त्यांनी सांगितलं.
बाबा, तुम्ही जबरदस्त बोलला…
यावेळी त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनाही टोले लगावले. बाबा तुम्ही आज जबरदस्त बोलला. बाबा तुम्हाला जरांगेंनाही समजवासं वाटत नाही का? तू ओबीसी आरक्षणातून आरक्षण मागू नको, जाळपोळ करणं चूक आहे, जिवंत काडतूस बाळगणं चूक आहे,पोलिसांवर हल्ला करणं चूक आहे, गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव टाकणं चूक आहे, गावबंदी करणं चूक आहे, एका समाजाच्या मागणीसाठी शहर बंद करून समाजाला वेठीस धरणं चूक आहे, अमूक तारखेपर्यंतच आरक्षण द्या अशी बालिश मागणी करणं आणि शासनाला धमकी देणं चूक आहे, सरसकट कुणबी आरक्षणाची मागणी चूक आहे, हे त्यांना सांगावसं वाटलं नाही का? तुम्ही त्यांना समजावलं असतं तर मला बरं वाटलं असतं. पण तुम्ही केलं नाही, असा चिमटा त्यांनी काढला.