भूपेश बघेल… सेक्स सीडी प्रकरणात तुरुंगवास ते मुख्यमंत्री
रायपूर : छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेंस अखेर संपला आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष भूपेश बघेल हे छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री असतील. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पाच दिवसांनंतर नावाची घोषणा केली. टीएस सिंहदेव, ताम्रध्वज साहू आणि चरण दास महंत यांचंही नाव चर्चेत होतं. भूपेश बघेल हे नाव देशाला समजलं जेव्हा 2017 मध्ये कथित सेक्स सीडी प्रकरणात […]
रायपूर : छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेंस अखेर संपला आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष भूपेश बघेल हे छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री असतील. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पाच दिवसांनंतर नावाची घोषणा केली. टीएस सिंहदेव, ताम्रध्वज साहू आणि चरण दास महंत यांचंही नाव चर्चेत होतं.
भूपेश बघेल हे नाव देशाला समजलं जेव्हा 2017 मध्ये कथित सेक्स सीडी प्रकरणात त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं. सीडी वाटप प्रकरणात भूपेश बघेल यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तुरुंगात पाठवलं होतं. विशेष म्हणजे बघेल यांनी जामीन घेण्यासही नकार दिला होता आणि त्यांची रवानगी थेट तुरुंगात करण्यात आली.
27 ऑक्टोबर 2017 रोजी एक कथित सेक्स सीडी व्हायरल झाली होती, ज्यात छत्तीसगडच्या एका मंत्र्याचंही नाव आलं होतं. या प्रकरणात नंतर दिल्लीतील एका पत्रकारालाही अटक झाली. काँग्रेसकडून या सीडीचं वाटप करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता.
विषयाचं गांभीर्य पाहता तत्कालीन मुख्यमंत्री रमण सिंह यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. या प्रकरणाशी संबंधित व्यक्ती रिंकू खनुजाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता.
कोण आहेत भूपेश बघेल?
भूपेश बघेल यांच्याकडे सध्या काँग्रेसच्या छत्तीसगड प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. अनेक वादांमुळे ते चर्चेत असतात. छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात ते राहतात. युवा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळलेली आहे.
2000 साली जेव्हा छत्तीसगड राज्याची निर्मिती झाली तेव्हा पहिल्यांदाच पाटण मतदारसंघातून बघेल निवडून गेले होते. यावेळी ते राज्यात कॅबिनेट मंत्री होते. 2003 साली काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर त्यांना विरोधी पक्षाचं उपनेता पद देण्यात आलं. त्यांचं राजकीय कौशल्य पाहता त्यांच्यावर 2014 साली काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.
बघेल यांनी जबाबदारी सांभाळत छत्तीसगडमध्ये पक्षाची यशस्वीपणे बांधणी केली आणि 15 वर्षांनी पुन्हा सत्ता मिळवली.