निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मोठी घोषणा, 2011 पर्यंतच्या झोपड्या पात्र करणार
आगामी विधानसभेसाठी शिवसेनेने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना आज एक मोठी घोषणा करणार आहे.
मुंबई : आगामी विधानसभेसाठी शिवसेनेने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना आज एक मोठी घोषणा करणार आहे. यानुसार महापालिका 2011 पर्यंतच्या झोपडीधारक, गाळे धारकांना पात्र करणार आहे. आज दिवसअखेर हा निर्णय होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेची आज गटनेत्यांची महत्वाची बैठक होत आहे. यात मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱ्या 2011 पर्यंतच्या झोपड्या पात्र करण्याचा निर्णय होईल. या निर्णयामुळे विविध प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱ्या झोपडपट्टी आणि व्यावसायिक गाळे धारकांना दिलासा मिळणार आहे.
शिवसेनेने हा निर्णय घेतल्यास याचा आगामी विधानसभा निवडणुकीत सकारात्मक परिणाम होईल, असा अंदाज शिवसेनेकडून बांधला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विधानसभेच्या निवडणुकांचे निकालच याचे उत्तर देणार आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारकडून निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनेही पावलं टाकली आहेत. येत्या ऑक्टोबर महिन्यात निवडणूक होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे सर्वपक्षीयांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.
याआधी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही विधानसभा निवडणुकीच्या तारखेचा अंदाज व्यक्त केला होता. चंद्रकांत पाटलांनी दिलेल्या माहितीनुसार, “9 नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपेल. 2014 मध्ये 15 ऑक्टोबरला मतदान झालं होतं. त्यामुळे यंदा 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान विधानसभेची निवडणूक होईल”