मोठा भाऊ कोण? शिंदे गटातच मतभेद; संजय निरुपम यांचा पक्षनेत्यांना घरचा आहेर काय?
ईव्हीएम हॅक झाली असती तर काँग्रेसला 99 जागा मिळाल्या असत्या का? भाजपला 240 जागा मिळाल्या असत्या का? अखिलेश यादवला 37 मिळाल्या असत्या का? तुम्ही पराभूत झाला हे सत्य स्वीकारा. यापूर्वी झारखंडचा खासदार 9 मताने पडला होता. अमोल कीर्तिकर 47 मताने पडले. तुम्हाला लोकांनी पाडलं आहे. हे तुम्ही सत्य स्वीकारलं पाहिजे, असं शिंदे गटाचे नेते संजय निरुपम म्हणाले.
महायुतीत मोठा भाऊ आणि छोटा कोण? यावरून वाद निर्माण झाला आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट आणि शंभुराज देसाई यांनी आपणच मोठा भाऊ असल्याचं म्हटलं आहे. त्यासाठी या दोन्ही नेत्यांनी निवडणुकीतील स्ट्राईक रेटचा हवालाही दिला आहे. त्यामुळे मोठा भाऊ, छोटा भाऊ ही चर्चा रंगलेली असतानाच आता शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी एक वेगळंच विधान करून नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे. निरुपम यांनी भाजपच मोठा भाऊ असल्याचं सांगत पक्षातील नेत्यांना घरचा आहेर दिला आहे.
भाजप महायुतीत मोठा भाऊ आहे. भाजप ही मोठी पार्टी आहे. त्यात शंका नाही. आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे. ठिक आहे. पण भाजप हा राज्यात आणि देशात मोठा पक्ष आहे, असं सांगतानाच भाजपचे सर्वात मोठे नेते देवेंद्र फडणवीस आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत हे वास्तव आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढलो. पुढेही लढू. फडणवीस यांचंही तसंच विधान आलं आहे, असं संजय निरुपम यांनी स्पष्ट केलं.
आदित्य ठाकरे माफी मागा
वायव्य मुंबईत मोबाईलवरून ईव्हीएम अनलॉक केल्याची बातमी एका वृत्तपत्राने दिली होती. त्यावरून वादळ उठलं होतं. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं होतं. निवडणूक आयोगालाही जाब विचारला होता. मात्र, ती बातमी खोटी असल्याचं वृत्त आज या वृत्तपत्राने दिल्यानंतर संजय निरुपम चांगलेच आक्रमक झाले आहेत. या मुद्द्यावरून त्यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे. ईव्हीएण हॅक करूनच वायकर यांचा विजय झाल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. आता या वृत्तपत्राने चुकीची बातमी दिल्याबद्दल माफी मागितली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनीही माफी मागितली पाहिजे, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे.
माफी दिलीच जाऊ शकत नाही
ईव्हीएमचा मुद्दा हा संवेदनशील मुद्दा आहे. भारताची लोकशाही परंपरा समृद्ध आहे. निवडणूक आयोग 60 ते 65 कोटी मतदारांना एकत्र करून, दीड महिना प्रचार करून शांततेने निवडणूक पार पाडतो. अशा निवडणूक आयोगाचं कौतुक करण्याऐवजी विरोधकांनी एका खोट्या बातमीवरून निवडणूक आयोगाला बदनाम केलं आहे. त्यासाठी विरोधकांना माफी दिली जाऊ शकत नाही. त्यांनी स्वत: पुढे येऊन माफी मागावी, अशी मागणीही निरुपम यांनी केली आहे.
मातोश्री खोटं बोलण्याचा कारखाना
मातोश्रीत खोटं बोलण्याचा कारखाना आहे. उद्धव ठाकरेंनी बनवलेली मातोश्री-2 ही घोटाळ्यातून बनली आहे. ती कशी बनली यावर कधी तरी बोलेल. मातोश्रीतून रोज एक खोटा विषय तयार केला जातो. आणि संजय राऊत तो लोकांपुढे मांडत असतात. लोकांमध्ये दुष्प्रचार सुरू केला जातो. तो आता बंद झाला पाहिजे. लोकांच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे. आम्ही कुठे चुकलो तर आम्हाला चूक दाखवणं हे विरोधकांचं काम आहे. पण विनाकारण सरकारला बदनाम करू नये. संजय राऊत रोज खोटं बोलत आहेत. त्याबद्दल त्यांना राज्यातील जनता माफ करणार नाही, असं ते म्हणाले.