औरंगाबाद जिल्हा परिषदेत धक्क्यावर धक्के, भाजप, शिवसेना, काँग्रेसमध्येही फाटाफूट
औरंगाबाद जिल्हा परिषदेत धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहेत (Aurangabad Zilha Parishad Election). भाजपसह काँग्रेस आणि शिवसेनेतही फूट पडल्याची शक्यता आहे. त्यामुळे या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
औरंगाबाद : राज्यातील सत्तासंघर्षानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही सर्वच राजकीय पक्षांचा कस लागल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात महाविकासआघाडीच्या यशस्वी प्रयोगानंतर सत्तास्थापना झाली. त्यानंतर या आघाडीला राज्यात इतर निवडणुकांमध्येही यश मिळालं. मात्र, औरंगाबाद जिल्हा परिषदेत धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहेत (Aurangabad Zilha Parishad Election). भाजपसह काँग्रेस आणि शिवसेनेतही फूट पडल्याची शक्यता आहे. त्यामुळे या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
औरंगाबादमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपचे 2 सदस्य फोडले आहेत. त्यामुळे भाजपचं संख्याबळ आता 23 वरून 21 वर आलं आहे. विशेष म्हणजे फोडाफोडीचा फटका केवळ भाजपलाच बसलेला नाही, तर याची झळ महाविकास आघाडीलाही लागली आहे. काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांमध्ये देखील फूट पडल्याचं सांगितलं जात आहे. या फुटीर काँग्रेस गटासोबत जवळपास 9 सदस्य असल्याचं बोललं जात आहे.
भाजप महाविकासआघाडीला शह देण्यासाठी फुटीरांच्या जोरावर भाजप अपक्षाला अध्यक्ष करण्याची शक्यता आहे. अपक्ष देवयानी डोनगावकर शिवसेनेकडून फुटल्याची माहिती समोर येत आहे. आता या राजकीय घडामोडींनंतर औरंगाबाद जिल्हा परिषदेचा निकाल काय लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहेत. पुढील तासाभरात हे चित्र स्पष्ट होणार आहे.