Aarey Carshed : फडणवीसांच्या मनसुब्यात मोठा अडथळा? आरेतल्या कारशेडला ब्रेक लावण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव, उद्याच फैसला
राजकारणाची चक्र पुन्हा फिरली अडीच वर्षातच ठाकरे सरकार पडलं आणि पुन्हा शिंदे- फडणवीस सरकार आलं, त्यानंतर फडणवीसांनी आपला पहिला निर्णय घेतला तो म्हणजे कारशेड पुन्हा आरेत नेण्याचा.
मुंबई : मुंबई मेट्रो कारशेडची (Mumbai Metro Carshed) अवस्था एखाद्या फुटबॉल सारखी झाली आहे, फुटबॉल जसा या नेटमधून त्या नेटमध्ये जातो तसंच काहीसं कारशेडचंही दिसून येत आहे. सर्वात आधी फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारच्या काळात मुंबई मेट्रोचं कारशेड हे आरेच्या जंगलात (Aarey Forest) घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबत कोर्टात अनेक सुनावण्या पार पडल्या. त्यानंतर आरेतल्या झाडांची कत्तल करण्यात आली. मात्र त्याला पर्यावरण प्रेमी आणि शिवसेनेकडून मोठा विरोध झाला. गेल्या अडीच वर्षात समीकरणे बदलली आणि राज्यात महाविकास आघाडी तयार होऊन शिवसेनेचाच मुख्यमंत्री खुर्चीवर बसला. त्यानंतर पहिला निर्णय झाला तो आरेतल्या मेट्रो कारशेडला ब्रेक लावला आणि आरेतलं मेट्रो कारशेड थेट कांजूरमार्गला नेण्यात आलं. मात्र राजकारणाची चक्र पुन्हा फिरली अडीच वर्षातच ठाकरे सरकार पडलं आणि पुन्हा शिंदे- फडणवीस सरकार आलं, त्यानंतर फडणवीसांनी आपला पहिला निर्णय घेतला तो म्हणजे कारशेड पुन्हा आरेत नेण्याचा.
ज्येष्ठ वकिलांची सुप्रीम कोर्टात धाव
मात्र आता फणसांच्या या मनसुब्यांना ब्रेक लागणार का? असा सवाल उपस्थित झालाय. आरेतल्या मेट्रो कार शेडला ब्रेक लावण्याच्या मागणीसाठी थेट सप्रेम कोर्टात याचिका दाखल झाली आहे. त्या याचिकेवर उद्याच सुनावणी पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेला मेट्रो कारशेड सरकार बनतात पुन्हा आरेमध्ये नेण्यासाठी फडणवीसांनी वेगाने हालचाली सुरू केल्या. मात्र त्यांच्या वाटेत आता आणखी एक अडथळा आलाय, ज्येष्ठ वकील गोपाल शंकर नारायण यांनीही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे.
प्रकरणावर उद्याच सुनावणी
सरन्यायाधीश रामण्णा यांनी डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे ही याचिका वर्ग केली आहे. राज्य सरकार आठवड्याच्या शेवटी आणखी एक जेसीबी चालवेल, म्हणून न्यायाधीशांकडे माझी विनंती आहे की कृपया उद्या या प्रकरणावर तात्काळ निर्णय द्यावा. अशी मागणी गोपाल शंकर नारायण यांनी केली आहे. त्यांच्या या याचिकेची दखल घेत सुप्रीम कोर्टानेही या याचिकेवर उद्याच सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता फडणवीस यांना उद्या कोर्टात आणखी एक धक्का बसणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कोर्टातली लढाई कोण जिंकणार?
तसेच केवळ राजकारण म्हणून निर्णय बदलू नका आणि पर्यावरणाची हानी करू नका असे आव्हान माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना केले आहे. यावरून सध्या बरेच राजकीय प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र आता कोर्टातली लढाई सुरू झाल्याने पुन्हा एकदा या प्रकरणावर मोठा सस्पेन्स तयार झाला आहे.