राजीनाम्यानंतरही शरद पवार राष्ट्रीय राजकारणात सक्रिय, बिहारमधील जम्बो बैठकीला जाणार; उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार
येत्या 17 आणि 18 मे रोजी बिहारच्या पाटणा येथे देशातील सर्व विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. भाजपच्या विरोधात रणनीती तयार करण्यासाठी विरोधक एकवटणार आहेत.
पाटणा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, असं असलं तरी शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणातून निवृत्त झालेले नाहीत. पवार अजूनही राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधली जात आहे. त्यात शरद पवारही सक्रिय आहेत. नितीश कुमार यांनी या संदर्भात पाटणा येथे विरोधकांची बैठक बोलावली आहे. दोन दिवस ही बैठक चालणार आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे विरोधकांच्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रीय राजकारणात विरोधक पुन्हा एकत्र येणार आहेत. येत्या 17 आणि18 मे ला बिहारच्या पाटण्यामध्ये विरोधकांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुणार यांनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सपा नेते अखिलेश यादव, कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी, डी. राजा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. नितीश कुमार यांनी या सर्व विरोधी पक्षनेत्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं आहे.
शरद पवार सक्रिय राहणार
बिहार विधान परिषदेचे सभापती आणि जेडीयू नेते देवेशचंद्र ठाकूर यांनी काल शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना शरद पवार आणि उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं. याचाच अर्थ शरद पवार यांनी फक्त पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतलेली नाही. राष्ट्रीय राजकारणातही ते सक्रिय राहणार असल्याचं स्पष्ट होत आहे.
सोरेन, पटनायक यांना भेटणार
कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर ही बैठक होत आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार लवकरच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. हे दोन्ही नेतेही पाटणा येथे होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जातं. कर्नाटक विधानसभा निवडणुकीमुळे मेच्या तिसऱ्या आठवड्यात ही बैठक होत आहे. कर्नाटकाच्या निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान होणार आहे. 13 मे रोजी या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.
राष्ट्रीय राजकारणात विरोधक पुन्हा एकत्र. 17 l,18 मे ला बिहारच्या पाटण्यामध्ये महत्त्वपूर्ण बैठक. बिहारचे CM नितीश कुमारनी बोलावली बैठक. #शरदपवार, #उद्धवठाकरे सहभागी होणार. कर्नाटक निकालानंतर बैठक. ममता बॅनर्जी,खरगे,केजरीवाल, अखिलेश,येचुरीना निमंत्रण.@TV9Marathi
— Sandip Rajgolkar (@SandipSR10) May 5, 2023
मोदींचा झंझावात रोखणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झंझावात रोखण्यासाठी देशातील सर्व विरोधक एकवटणार आहेत. 2024च्या निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक रणनीती ठरवणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.