मोठी बातमी: बिहारमधील नितीश-तेजस्वी सरकार पडणार?, मोठ्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
जेडीयू-आरजेडी युती तुटण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. त्याची कारणं काय आहेत पाहुयात...
पटना : बिहारच्या (Bihar) राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. जेडीयूने भाजपसोबत काडीमोड केल्यानंतर 10 ऑगस्टला 2022 ला बिहारमध्ये जेडीयू-आरजेडी आघाडीचं (JDU RJD Alliance) सरकार सत्तेत आलं. त्यानंतर आता ही युती तुटण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. या दोन्ही पक्षातील नेत्यांच्या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळातील चर्चांना अधोरेखित केलं जात आहे.
बिहारचे माजी कृषिमंत्री आणि आरजेडीचे आमदार सुधाकर सिंह मागच्या काही दिवसांपासून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विरोधात विधानं करत आहेत. अशातच आता जेडीयूचे नेतेही सिंह यांच्या विधानाला जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. उपेंद्र कुशवाह यांनी सुधाकर सिंह यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
सुधाकर सिंह यांचं विधान काय?
आरजेडीचे नेते सुधाकर सिंह हे नितीशकुमार यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. “नितीश कुमार यांना 350 कोटींच्या विमानातून आरामात फिरायचं आहे. बिहारला विशेष दर्जा मिळावा यासाठी ते हातात कटोरा घेऊन दिल्लीला जात आहेत. असा भिकारी मी कधीही पाहिला नाही. यांनी लाज विकली आहे”, असं सुधाकर सिंह म्हणाले आहेत.
सुधाकर सिंह यांच्या विधानाला उपेंद्र कुशवाह यांनी उत्तर दिलं आहे. सुधाकर सिंह यांची असली बेताल वक्तव्य खपवून घेतली जाणार नाहीत. ज्यांच्या पाठिशी बिहारची जनता आहे. जनतेनं प्रेम देऊन त्यांना मुख्यमंत्री केलंय.अशाविरोधात नेत्यासाठी सुधाकर सिंह यांची असली वक्तव्य कुणालाही आवडणारी नाहीत. सिंह यांच्या वक्तृत्वामुळे युतीचं मोठं नुकसान होऊ शकतं.लक्षात घ्यायला हवं.या वक्तव्याचे परिणाम काय होतील माहिती नाही. पण युती तुटेल या भीतीने यावर मी काहीही न बोलणं उचित नाही. ती तत्वांशी तडजोड असेल. ही तडजोड मला मान्य नाही, असं उपेंद्र कुशवाह म्हणाले आहेत.
सुधाकर सिंह यांच्या या वक्तव्यानंतर आरजेडीकडून त्यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. हे त्यांचं वैयक्तिक विधान असल्याचं म्हणण्यात आलं आहे.
मागच्या काही दिवसांपासून वारंवार केले जाणारे आरोपप्रत्यारोप पाहता ही युती तुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. युती तुटल्यास सरकार कोसळणार असल्याची चर्चा बिहारच्या राजकीय वर्तुळात होत आहे.