मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेटर बॉम्ब (Parambir Singh letter) टाकून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra home Minister Anil Deshmukh) यांनी अटकेत असलेले निलंबित एपीआय सचिन वाझे (API Sachin Vaze) यांना महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा उल्लेख परमबीर सिंगांच्या पत्रात आहे. बार, रेस्टॉरंट यांच्याकडून ही वसुली करण्याचं सांगितलं होतं, असा दावा सिंग यांनी आपल्या पत्रात केला आहे. थेट गृहमंत्र्यांवर इतका मोठा आरोप केल्याने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. (BJP and other parties demands of President rule in Maharashtra and HM Anil Deshmukh resignation after Parambir Singh letter)
भाजपने आक्रमक पवित्रा घेत, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेऊन त्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर दिल्ली भाजपने ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत, सरकार बरखास्तीची मागणी केली आहे.
महाराष्ट्र सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपने केली आहे. भाजप खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. मनसुख हिरेन यांची हत्या झाली असून, सचिन वाझे यांचा त्यामध्ये हात असल्याचा आरोप करत नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेवरुन राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे.
दरम्यान, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही आपण राज्यपालांना भेटणार असल्याचं सांगितलं. “आमची मागणी आहे राज्यपाल महोदयांनी राज्य सरकार घटनेनुसार चालत नसेल तर त्याची माहिती राष्ट्रपतींना कळवणे गरजेचे आहे. परवा आम्ही राज्यपाल यांना भेटणार आहोत. राज्यपालांनी राज्याची माहिती राष्ट्रपतींना कळवावी, अशी मागणी राज्यपालांकडे करणार आहोत”, असं मुनगंटीवार म्हणाले.
भाजप नेते नारायण राणे यांच्या पाठोपाठ अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्रं लिहिलं आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी या पत्रातून केली आहे. खासदार नवनीत राणा यांनी 8 मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्रं लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक सापडल्याचा आणि मनसुख हिरेन प्रकरणाचा उल्लेख केला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या घटनाक्रमाचा उल्लेख करत या संपूर्ण प्रकरणाची एनआयएमार्फत चौकशी करण्याची आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
नवनीत राणा या अपक्ष खासदार आहेत. मात्र त्यांचे पती रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष आहे. नवनीत राणा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे तत्कालिन खासदार आनंदराव अडसूळ यांना हरवून, लोकसभेत पोहोचल्या.
राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारा तिसरा पक्ष म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा आरपीआय पक्ष. “महाराष्ट्रात कायदा सुवस्यवस्था बिघडली असल्याने, राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची मागणी मी आज अमित शाह यांच्याकडे करणार आहे. माझ्या मागणीचे पत्र मी देणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत. त्यांनी तातडीने मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. अनिल देशमुखांवर झालेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे”, असं रामदास आठवले म्हणाले.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे आज दुपारी १२:१५ वाजता राज्यपालांची भेट घेणार आहेत. या भेटीत हे सरकार बरखास्त करावे अशी मागणी ते करणार आहेत.
राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?
संबंधित बातम्या
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; राणेंपाठोपाठ नवनीत राणा यांचेही अमित शहांना पत्रं
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; रामदास आठवले गृहमंत्र्यांची भेट घेणार
Special Report | राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार?
राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? महाराष्ट्रात कधी-कधी लागू झाली?
(BJP and other parties demands of President rule in Maharashtra and HM Anil Deshmukh resignation after Parambir Singh letter)