भाजपची नवी यादी जाहीर, महाराष्ट्रातील एक उमेदवार घोषित
भंडारा : लोकसभा निवडणूक 2019 साठी भाजपची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. सुनील मेंढे हे सध्या भंडारा नगर परिषदेचे अध्यक्ष आहेत. कोण आहेत सुनील मेंढे? सुनील मेंढे यांनी इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आहे. ते बांधकाम व्यावसायिक आहेत. याशिवाय […]
भंडारा : लोकसभा निवडणूक 2019 साठी भाजपची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. सुनील मेंढे हे सध्या भंडारा नगर परिषदेचे अध्यक्ष आहेत.
कोण आहेत सुनील मेंढे?
सुनील मेंढे यांनी इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आहे. ते बांधकाम व्यावसायिक आहेत. याशिवाय त्यांनी 12 वीपर्यंत सीबीएससी शाळाही सुरु केली आहे. भंडार-गोंदिया लोकसभा क्षेत्र बरंच मोठं असून भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांचा यात समावेश आहे. भंडार-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही नेहमी जातीय समीकरणावर आधारित असते. या क्षेत्रात पोवार, कुणबी, तेली आणि बौद्ध समाजाचे लोक बहुसंख्य आहेत. सुनील मेंढे हे कुणबी समाजाचे असल्याने निवडणुकीत त्यांना जातीचा फायदा होऊ शकतो, असे मेंढेंना उमेदवारी देण्यामागील भाजपचे गणित आहे. तसेच सुनील मेंढे हे संघाचे स्वयंसेवक असून त्यांना संघाचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल लढणार?
भाजपने आपला उमेदवार जाहीर केला असला, तरी भंडारा-गोंदिया मतदारसंघातून राष्ट्रवादी कुणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार हे अद्याप जाहीर झालेलं नाही. मात्र, भंडारा-गोंदिया मतदारसंघातून राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याचे विद्यमान खासदार मधुकर कुकडे यांचा पत्ता कट होणार, अशी चर्चा भंडारा-गोंदियाच्या राजकीय वर्तुळात आहे. प्रफुल्ल पटेलांसाठी स्वत: शरद पवार यांचा आग्रह असून, पटेलांचाही लढण्यास होकार आहे.
निवडणुकीच्या तारखा जाहीर :
केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.
महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.