पंकजा मुंडेंनंतर आता प्रीतम मुंडेंची फेसबुक पोस्ट वायरल
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नी 27 जानेवारीला लढा उभारणाऱ्या पंकजा मुंडे यांना पाठिंबा देण्यासाठी औरंगाबाद येण्याचं आवाहन प्रीतम मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
मुंबई : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावरुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. त्यावेळी पंकजा मुंडे यांची कार्यकर्त्यांना साद घालणारी फेसबुक पोस्ट वायरल झाली होती, आता त्यांची भगिनी आणि भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनीही फेसबुक पोस्ट (Pritam Munde Facebook Post) लिहून कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नी 27 जानेवारीला लढा उभारणाऱ्या पंकजा मुंडे यांना पाठिंबा देण्यासाठी औरंगाबाद येण्याचं आवाहन प्रीतम मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
पंकजा मुंडे एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार असून यामध्ये भाजपचे बडे नेते सहभागी होणार आहेत. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सहभागी होणार असून मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावरुन भाजप रान उठवणार आहे.
मराठवाडा वॉटर ग्रीड सारख्या योजनेची अंमलबजावणी करणे, मराठवाड्याच्या हक्काचे पाणी, जलसंधारण, पाण्याचे संवर्धन, पिण्याचे पाणी या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात सोमवार 27 जानेवारी रोजी 10 वाजता औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रीतम मुंडे यांनी दिली आहे.
काय आहे प्रीतम मुंडे यांची फेसबुक पोस्ट?
नमस्कार..
मागील अनेक वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकरी,सामान्य जनता निसर्गाच्या अवकृपेमुळे सतत दुष्काळाचा सामना करत आहे.पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती व शेतकरी बांधव पाण्याअभावी अडचणीत आले आहेत.एकीकडे नैसर्गिक संकटांना तोंड देत असतानाच दूसरीकडे त्यामुळे उद्भवलेल्या बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना मराठवाडयातील शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
या दुहेरी संकटांवर मात करण्यासाठी व अशा परिस्थितीतीवर कायम स्वरूपीच्या उपाय योजना करण्यासाठी मा.पंकजाताई मुंडे यांनी भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे, पाण्याचे संवर्धन अशा अनेक शाश्वत स्वरूपाच्या उपाय योजना मराठवाड्यात यशस्वीपणे राबविल्या आहेत. तसेच मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी महत्वाकांक्षी योजना देखील पंकजाताईंच्या पाठपुराव्याने मागील सरकारने मंजूर केली होती, तिची अंमलबजावणी करणे, त्याच बरोबर मराठवाड्याच्या हक्काचे पाणी,जलसंधारण,पाण्याचे संवर्धन,पिण्याचे पाणी या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मा.पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात सोमवार दि.२७ जानेवारी रोजी सकाळी ठीक १०.वाजता औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांसह सामान्य जनतेच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदती ठेवायची असेल तर मराठवाड्याच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न मार्गी लागणे अत्यावश्यक आहे. मा.पंकजाताई मुंडे यांनी आपल्यासाठी,आपल्या शेतकरी बांधवांसाठी,आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी,आपल्या पाणी प्रश्नांसाठी लढा उभारला आहे.आपण ही या लढ्यात सहभागी होऊन मराठवाड्याच्या पाणी प्रश्नांसाठी लढा उभारणाऱ्या रनरागिणीला पाठींबा देऊ या !!
Pritam Munde Facebook Post