नवी दिल्ली | 27 जानेवारी 2024 : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार महाआघाडीशी संबंध तोडून पुन्हा भाजपमध्ये सामील होण्याची अटकळ बांधली जात आहे. अशातच भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 23 राज्यांच्या राज्य प्रभारी आणि सह प्रभारी यांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्टाचे नाव नाही. मात्र, महाराष्ट्रातील दोन नेत्यांकडे दोन महत्वाच्या राज्याचे प्रभारी पद देण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि प्रवक्ते बैजयंत ‘जय’ पांडा यांची उत्तर प्रदेश राज्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
एप्रिल – मेमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी भाजपने निवडणुकीचा बिगुल वाजवला आहे. भाजपने दोन दिवसांपूर्वीच ‘था भी तो सब मोदी को चुनते हैं’ या प्रचाराचे थीम साँग आणि व्हिडिओ लाँच केला होता. तर, दुसरीकडे बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी भाजपच्या जाहीरनाम्यात योगदान देण्यासाठी तरुण मतदारांना आमंत्रित केले. नमो ॲपवर त्यांचे विचार मांडण्यास त्यांनी सांगितले आहे. “मी भविष्यात काही योगदानकर्त्यांना भेटण्यास उत्सुक आहे,” असेही त्यांनी आपल्या X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भाजपने पंतप्रधान मोदी यांची पोस्ट प्रसारित केली. यामध्ये मोदी यांनी लोकांना आवाहन केले होते. ज्यांनी अद्याप मतदार म्हणून नोंदणी केली नसेल तर त्यांनी त्वरित स्वतःची नोंदणी करावी असे पंतप्रधान मोदी यांनी मोदी यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. या पाठोपाठ भाजपचे महासचिव अरुण सिंह यांनी राज्य प्रभारी यांची यादी जाहीर केली आहे.
भाजपचे राज्यातील नेते विनोद तावडे यांची बिहार राज्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची केरळ राज्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे इंडिया आघाडीसोबत असलेले संबंध तोडून पुन्हा भाजपमध्ये सामील होणार अशी चर्चा आहे. याच बिहार राज्याची जबाबदारी राज्याचे माजी विरोधी पक्षनेते, माजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda ने आगामी लोकसभा चुनाव के लिए निम्नलिखित राज्यों में प्रदेश चुनाव प्रभारी एवं सह-चुनाव प्रभारी की नियुक्ति की है। pic.twitter.com/1hpPH4cNsa
— BJP (@BJP4India) January 27, 2024