भाजपमध्येही कलह, जळगावचा उमेदवार ऐनवेळी बदलला
जळगाव : काँग्रेस पाठोपाठ आता भाजपनेही आपला उमेदवार बदलला आहे. भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघात आमदार स्मिता वाघ यांच्याऐवजी आता आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली आहे. काही दिवसांपूर्वी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर असताना, त्यांना डावलून त्यांच्या जागी भाजपने उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली. महत्त्वाचं म्हणजे भाजपने विद्यमान खासदार ए टी पाटील यांचं तिकीट […]
जळगाव : काँग्रेस पाठोपाठ आता भाजपनेही आपला उमेदवार बदलला आहे. भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघात आमदार स्मिता वाघ यांच्याऐवजी आता आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली आहे. काही दिवसांपूर्वी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर असताना, त्यांना डावलून त्यांच्या जागी भाजपने उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली. महत्त्वाचं म्हणजे भाजपने विद्यमान खासदार ए टी पाटील यांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. मात्र आता स्मिता वाघ यांच्याही तिकीटावर खाट मारुन, उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या अंतर्गत कलहामुळे उमेदवारी कापल्याचं सांगण्यात येत आहे.
जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुलाबराव देवकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे जळगावात आता उन्मेष पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर यांच्यात लढत होणार आहे.
विद्यमान खासदार ए.टी.पाटील यांच्या बंडांचा फटका बसण्याची शक्यता, तसंच राष्ट्रवादीचे उमेदवार माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या तुलनेत स्मिता वाघ कमकुवत ठरण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांच्या ऐवजी चाळीसगावचे भाजप आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
भाजपला जाहीर केलेला उमेदवार बदलावा लागल्याची ही पहिलीच घटना ठरली.आधी गिरीश महाजन यांच्या पत्नीच्या नावाची चर्चा सुरु होती. पण आता उन्मेष पाटलांचे नाव निश्चित झाल्याने, जळगावमधील राजकीय वातावरण बदलून गेलं आहे.
काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी विद्यमान खासदार ए टी पाटील यांना गप्प राहण्याचा सल्ला दिला होता. ‘गिरीश महाजन यांनी माझा घात केला’, असा आरोप त्यांच्याच पक्षातील जळगावचे विद्यमान खासदार ए.टी. पाटील यांनी केला होता. यानंतर महाजनांनी ए.टी. पाटील यांना गप्प राहण्याचा सल्ला दिला. “मी बोललो तर त्यांची पंचाईत होईल”, असा दम महाजनांनी ए.टी. पाटलांना दिला होता. ही सर्व परिस्थिती पाहता स्मिता वाघ यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय भाजपने घेतला.
संबंधित बातम्या
ए. टी. पाटील गप्प राहा, मी बोललो तर पंचाईत होईल : गिरीश महाजन