भाजपमध्ये मोठ्या हालचालींना वेग, आज दिवसभर चिंतन, मंथन आणि खलबतं; केंद्रीय नेते मुंबईत
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजप कामाला लागली आहे. भाजपने आज मुंबईतील प्रदेश कार्यालयात महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राज्यभरातील भाजपचे महत्त्वाचे 21 नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच या बैठकीला केंद्रीय नेतेही उपस्थित राहणार असून लोकसभेतील पराभव आणि विधानसभा निवडणुकीतील रणनीतीवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपमध्ये मोठ्या हालचालींना वेग आला आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर आज भाजपची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील पराभवाची मिमांसा करतानाच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्लॅनही आखण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या बैठकीसाठी केंद्रातील दोन महत्त्वाचे नेतेही आले आहेत. दिवसभर प्रदेश कार्यालयात चिंतन, मंथन आणि खलबते केली जाणार आहेत. या बैठकीनंतर जुलैमध्ये भाजपची दोन दिवसाची चिंतन बैठक होणार आहे.
भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात ही बैठक होणार आहेत. या बैठकीला भाजपचे केंद्रीय नेते भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव उपस्थित आहेत. भूपेंद्र यादव हे निवडणूक प्रभारी म्हणून तर वैष्णव हे निवडणूक सह प्रभारी म्हणून उपस्थित राहणार आहेत. भाजपचे सर्व महत्त्वाचे नेते प्रदेश कार्यालयात जमले आहेत. थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे. राज्यभरातील महत्त्वाचे एकूण 21 सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
भाजपचे बडे नेते प्रदेश कार्यालयात
भाजप प्रभारी जयभानसिंह पवैय्या, सहप्रभारी श्याम धुर्वे आणि राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिव प्रकाश यांचीही प्रमुख उपस्थित आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, मंत्री अतुल सावे, खासदार धनंजय महाडिक, भाजप नेते गणेश नाईक, आमदार श्रीकांत भारतीय यांच्यासह भाजपच्या कोअर कमिटीचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत.
जबाबदाऱ्यांचं वाटप होणार?
आज होणाऱ्या बैठकीत निवडणूक हा अजेंडा असेल. लोकसभा निवडणुकीतील पराभवावर चर्चा होणार आहे. तसेच विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार आहे. त्यासाठी आजपासूनच कामाला लागण्याचे आदेश दिले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय विधान परिषदेच्या पाच जागांवरही या बैठकीत चर्चा होणार असून या जागांसाठीची नावे ठरवली जाणार आहेत. काही पराभूत उमेदवारांवर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व ज्येष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपवली जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. पक्षातील हेवेदाव्यांवरही चर्चा केली जाणार असल्याचं सांगितलं जातं. तसेच मित्र पक्षांनी लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघात सहकार्य केले नाही, त्याचीही चर्चा या बैठकीत होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. याशिवाय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची आता महाराष्ट्र भाजपच्या कामगिरीवर करडी नजर असल्याचे संकेतही या बैठकीतून देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
पुण्यातही दोन दिवस चिंतन
दरम्यान विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपची महत्त्वाची बैठक होणार आहे. येत्या 13 आणि 14 जुलै रोजी ही बैठक होणार आहे. स्वत: भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह ही बैठक घेणार आहेत. या दोन दिवसांच्या बैठकीत 13 जुलै रोजी प्रदेश पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना कार्यक्रम दिला जाणार आहे. त्यानंतर 14 जुलै रोजी विस्तारीत कार्यसमितीची बैठक होणार आहे. यावेळी 4 हजार पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.