उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत काँग्रेस,राष्ट्रवादीचे विचार घुसवले; भाजपाचा ठाकरे गटला टोला
निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यानं आता ठाकरे गटाला निवडणूक दुसऱ्या चिन्हावर लढवावी लागणार आहे. यावरून भाजपाने उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावला आहे.
मुंबई : निवडणूक आयोगाकडून (Election Commission) धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यानं आता ठाकरे गटाला निवडणूक (Election) दुसऱ्या चिन्हावर लढवावी लागणार आहे. तसेच शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाहीये. निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा मोठा फटका हा ठाकरे गटला बसला आहे. ठाकरे गट अडचणीत आला आहे. या सर्व परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना भाजप (BJP) नेते, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत काँग्रेस, राष्ट्रवादीचे विचार घुसवले, त्यांच्यामुळे आज शिवसेनेचं चिन्ह गोठवण्याची वेळ आली. अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांनी आता तरी सुधारावे अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाले मुनगंटीवार?
सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. त्यांना बाळासाहेबांनी स्वाभीमान शिकवला आहे, शिवसैनिक बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन चालत आहे. जर या शिवसैनिकाला कोणी जय शरद पवार, जय सोनिया, जय राहूल गांंधी असा विचार जर कोणी शिकवण्याचा प्रयत्न केला, तर तो बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. तेव्हा अशी परिस्थिती तर निर्माण होणारचना असा घणाघात मुनगंटीवार यांनी केला आहे.
आज चिन्ह निश्चित होण्याची शक्यता
दरम्यान दुसरीकडे आज शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या नव्या चिन्हाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आल्यानं आता शिंदे गटा आणि ठाकरे गटाला चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे तीन पर्याय सादर करावे लागणार आहेत, त्यातील एकाला चिन्ह म्हणून मान्यता मिळणार आहे.