‘या’ दोन कारणांमुळे हरलो, भाजपच्या पराभूत उमेदवारांचा सूर
भाजपने विधानसभा निवडणुकीत 164 जागा लढवल्या होत्या, मात्र 105 जागांवरच त्यांना विजय मिळवता आला.
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेली सभा आणि शिवसेना यांच्यामुळे पराभव झाला, असा सूर भाजपच्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीत निघाला. भाजपने 59 पराभूत उमेदवारांसोबत बैठक घेऊन पराभवावर विचारमंथन (BJP Defeated Candidates Meeting) केलं.
भाजपने शिवसेनेला एनडीएतून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर 25 वर्ष जुन्या युतीत फाटाफूट झाल्याचं स्पष्ट झालं. शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची मागणी भाजपने अमान्य केली आणि दोघांमध्ये दुरावा आला. राज्यातल्या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपने मंथन बैठकीचं आयोजन केलं होतं.
यावेळी पराभूत उमेदवारांनी शिवसेनेने केलेल्या असहकार्यामुळे आम्हाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला असा सूर लावला. याशिवाय शरद पवारांनी भर पावसात घेतलेली सभाही पराभवासाठी कारणीभूत ठरल्याचं या उमेदवारांचं म्हणणं आहे. या बैठकीला पंकजा मुंडे, राम शिंदे, राजकुमार बडोले, एकनाथ खडसेंची कन्या रोहिणी खडसे, हर्षवर्धन पाटील आणि वैभव पिचड यासारखे दिग्गज उमेदवार उपस्थित होते.
भाजपने विधानसभा निवडणुकीत 164 जागा लढवल्या होत्या, मात्र 105 जागांवरच त्यांना विजय मिळवता आला.
काही उमेदवारांना स्वीकारावा लागलेला पराभव हा निसटता होता. यावेळी स्थानिक कारणं देखील कारणीभूत असल्याचं निष्कर्ष काढण्यात आला. पण आता खचून न जाता जिद्दीने आणि नव्या उमेदीने उभे राहा. नगरपालिका, ग्राम पंचायत, जिल्हा परिषदांमध्ये जिद्दीने कामाला लागा, विजय आपलाच आहे, अशा शब्दात पराभूत उमेदवारांना नवी ऊर्जा देण्यात आली.
भाजपचे विधीमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केलं. यावेळी सर्वांना सन्मानाची वागणूक दिली जाईल असा विश्वास त्यांना देण्यात आला.
एनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत
राज्यात सध्या सत्तासंघर्ष तीव्र झाला आहे. पण या साऱ्या घडामोडींमध्ये भाजपने पक्षबांधणीवर लक्ष केंद्रित करत मंथन बैठकीचं आयोजन केलं. पराभूत उमेदवारांनी (BJP Defeated Candidates Meeting) आपल्या नाराजीला वाट करुन दिल्यानंतर नव्या जोमाने कामाला लागण्याची हमी दिली.