फक्त अडवाणीच नव्हे, ‘या’ पाच दिग्गजांनाही भाजपचा डच्चू!
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे तिकीट कापून, त्यांच्या गांधीनगर मतदारसंघातून भाजपाध्यक्ष अमित शाह लढतील, असे जाहीर केले. अडवाणींचे तिकीट कापल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होती. मात्र याशिवाय भाजपने देशातील आणखी पाच दिग्गज विद्यमान खासदारांचेही तिकीट कापलं. यामध्ये बॉलिवूड अभिनेते परेश रावल, शत्रुघ्न सिन्हा, उमा […]
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे तिकीट कापून, त्यांच्या गांधीनगर मतदारसंघातून भाजपाध्यक्ष अमित शाह लढतील, असे जाहीर केले. अडवाणींचे तिकीट कापल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होती. मात्र याशिवाय भाजपने देशातील आणखी पाच दिग्गज विद्यमान खासदारांचेही तिकीट कापलं. यामध्ये बॉलिवूड अभिनेते परेश रावल, शत्रुघ्न सिन्हा, उमा भारती, शांता कुमार आणि शाहनवाज हुसैन यांचा समावेश आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि बॉलिवूड अभिनेते परेश रावल यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. गुजरातमधील भाजप नेते जीतू वाघाणी यांनी याबाबतची माहिती शनिवारी दिली. यापूर्वी परेश रावल यांनी स्वत: ट्वीट करत म्हटले होते की, मी यापुढील लोकसभा निवडणूक लढवणार नाही. परेश रावल हे गुजरातमधील अहमदाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
परेश रावल म्हणाले, मी निवडणूक लढवणार नाही. गेल्या 5 वर्षापासून सिनेमांच्या कामात व्यस्त असल्याने मी लोकसभेत पुरेसा वेळ देऊ शकलो नाही. पण मी नेहमी पक्षासाठी काम करेन. मी भाजपचा निष्ठावान सदस्य आणि नरेंद्र मोदींचा कट्टर समर्थक आहे”.
2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान अहमदाबाद पूर्व लोकसभामध्ये परेश रावल 3 लाख 25 हजार मतांनी निवडून आले होते. भाजपने शनिवारी संध्याकाळपर्यंत 286 उमेदवाऱ्यांच्या नावाची घोषणा केली होती. यामध्ये अनेक दिग्गजांच्या तिकीट कापल्याचे दिसून आले.
शांता कुमारांना डच्चू
भाजपने जाहीर केलेल्या नव्या यादीत हिमाचल प्रदेशमधील दोन खासदारांचे तिकीट कापलं आहे. यामध्ये शांता कुमार आण वीरेंद्र कश्यप यांचा समावेश आहे. पक्षाने शिमलाचे विद्यमान खासदार विरेंद्र कश्यप यांच्या जागेवर सुरेश कश्यप आणि कांगडा-चंबाव येथील शांता कुमार यांच्या जागेवर किशन कपूर यांना तिकीट देण्यात आली आहे.
शत्रुघ्न सिन्हांचाही पत्ता कट
भाजपमधील प्रसिद्ध आणि दिग्गज खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचेही तिकीट भाजपने कापलं आहे. शत्रुघ्न सिन्हांच्या जागेवर केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने डच्चू दिल्याने हे चार दिग्गज आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपमध्ये राहून पक्षविरोधी वक्तव्य शत्रुघ्न सिन्हांना भोवल्याची चर्चा आहे.
उमा भारती आणि शाहनवाज हुसैन
उमा भारती यांनी मी निवडणूक लढवणार नाही, अशी माहिती पक्षाला दिली होती. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष पद देण्यात आले होते. तसेच भगलपूर येथून शाहनवाज हुसैन यांचं तिकीट कापण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर जेडीयूचे अजय कुमार मंजल यांना एनडीएची उमेदवारी देण्यात आली आहे.