ठाणे : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. आता आम्हाला दुसरा कोणताही राजकीय पक्ष (Political Party in Maharashtra) फोडण्यात इंटरेस्ट नाही, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. दुसऱ्याचा पक्ष फोडण्याची भाजपला गरज नाही, असंही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण (Devendra Fadnavis Ashok Chavhan Visit) भेटीनंतर सुरु झालेल्या राजकीय चर्चांवर दानवे यांनी आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिली. यावेळी इतर पक्षातील असंतुष्ट राजकीय नेत्यांवरही त्यांनी महत्त्वाचं विधान केलंय. दानवेंनी केलेल्या विधानाचे आता राजकीय अर्थ काढले जात आहेत. गणेशोत्सवासाठी कपिल पाटील यांच्या निवासस्थानी आले असता रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केलंय. ते ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते.
कपिल पाटील यांच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की,..
दुसरा पक्ष फोडण्यात भाजपला इंटरेस्ट नाही. कुणाचा पक्ष भाजप फोडतही नाही. पण कुणाच्या पक्षात जर फूट पडत असेल आणि ते जर आम्हाला मदत करत असतील तर आम्ही त्यांच्यासोबत एकत्र यायला तयार आहोत. आम्हाला जेव्हा गरज पडेल आणि उपयोग होईल, तेव्हा जेवढे केवढे असंतुष्ट गट असतील, त्यांचा भाजपसाठी तेव्हा उपयोग करुन घेऊ. आज आम्हाला कुणाचीही गरज नाहीये. आमच्या विचारांशी असंतुष्ट सहमत असतील, तर त्यांना सोबत घेऊ.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री असलेल्या रावसाहेब दानवे यांनी केलेलं हे विधान महत्त्वाचं मानलं जातंय. आगामी काळातील राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने दानवेंनी केलेल्या विधानाला महत्त्व प्राप्त झालं आहे.
येत्या काळात भाजप आपली ताकद वाढवण्यासाठी इतर पक्षातील कोणकोणत्या असंतुष्टांना आता आपल्यासोबत घेतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दानवेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलंय.