Jamal Siddiqui : भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्धीकी यांना जीवे मारण्याची धमकी!
आधी धरणे, मोर्चे आणि आता थेट जीवे मारण्याची धमकी! धमकीनंतर जमाल सिद्धीकींची पहिली प्रतिक्रियाही समोर, नेमकं ते काय म्हणाले?
गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर : भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्धीकी (Jamal Siddiqui) यांना जीवे मारण्याची (Life threat) धमकी देण्यात आलीय. त्यांना आलेल्या धमकीच्या पत्राने एकच खळबळ उडाली. एक पत्र जमाल सिद्धीकी यांच्या कार्यालयात आढळून आलं. हे निनावी पत्र असून या पत्राद्वारे त्यांना धमकावण्यात आलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, असा आरोप करण्यात आलाय.
काळ्या शाई पेनाने एका कागदावर हिंदी भाषेत मजकूर लिहून जमाल सिद्धीकी यांना धमकी देण्यात आलीय. गुरुवारी आलेल्या या पत्राप्रकरणी त्यांनी नागपूर पोलिसात तक्रार दाखल केलीय. दरम्यान, या धमकीनंतर सिद्धीकी यांनी टीव्ही 9 मराठीसोबत बातचीत केली आणि आपलं सविस्तर म्हणणंही मांडलं.
भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्धीकी यांना जिवे मारण्याची धमकी. धमकीचं पत्र जमाल सिद्धीकी यांच्या कार्यालयात पाठवण्यात आलंय. जमाल सिद्धीकी RSS च्या गुरुपुजन कार्यक्रमात सहभागी झाल्याने धमकी आल्याची माहिती. pic.twitter.com/Pv8SX5B5xl
— gajanan umate (@gajananumate) October 21, 2022
जमाल सिद्धीकी यांच्या कार्यालयात गुरुवारी धमकीचं पत्र पाठवण्यात आलं होतं. आरएसएसच्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात, त्यामुळे आता तुम्ही गैरमुस्लिम झाला आहात, असं म्हणत सिद्धीकी यांच्यावर आरोप करण्यात आला. तसंच तुम्ही इस्लामचा अपमान केला आहे, असंही धमकीच्या पत्रात म्हटलंय.
‘मुस्लिम कोम से गद्दीरी की सजा, सर तन से जुदा’ असं म्हणत सिद्धीकी यांना धमकावण्यात आलं आहे. धमकीचं पत्र आणि तक्रार सिद्धीकी यांनी सक्करदरा येथील पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे दिली आहे. आता पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
धमकीचं पत्र आल्यानंतर टीव्ही 9 मराठीने जमाल सिद्धीकी यांच्या संवाद साधला. त्यावेळी सिद्धीकी यांनी आपल्याविरोधात आधीही धरणं, मोर्चे निघाल्याचं सांगितलं. आता जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानं याची तक्रार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं सिद्धीकी यांनी म्हटलं. तसंच नागपूर पोलीस आयुक्तांनाही याबाबत सांगणार असल्याचं ते म्हणाले.
‘इस्लामिक स्टेटकडे नेण्याचा हा प्रकार आहे. माझ्या विरोधात फतव्याचीही धमकी देण्यात आलीय. मी याला घाबरतात नाही, काम सुरु ठेवणार, पण सरकारने अशा कट्टरपंथी लोकांना संपवून टाकावं, अशी मागणी सरकारकडे मी करणार आहे’, असंही जमाल सिद्धीकी यांनी यावेळी म्हटलं. दरम्यान, आता ही धमकी पाठवणारे कोण आहेत, कुणी हे पत्र लिहिलं होतं, त्यांच्यावर कारवाई काय होणार, या सगळ्या बाबी पोलिसांच्या तपासाअंती स्पष्ट होईल.