आमचं हिंदुत्व म्हणजे त्वचा, शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे सत्तेसाठी पांघरलेली शाल- आशिष शेलार
आम्ही खऱ्या हिंदुत्वाच्या सानिध्यात वाढलो आहोत, शिवसेनेचं हिंदुत्व भेसळयुक्त | Ashish Shelar
मुंबई: सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या मेळाव्यात हिंदुत्वाविषयी मांडलेल्या विचारांचा शिवसेनेकडून विपर्यास करुन सोयीस्कर असा अर्थ काढण्यात आला. सरसंघचालकांची ती व्याख्या म्हणजे हिंदुत्वाची खरी त्वचा आहे. मात्र, शिवसेनेने सत्तेसाठी या त्वचेचा त्याग केला. आता शिवसेनेच्या अंगावर केवळ हिंदुत्वाची शाल पांघरलेली आहे. त्यामुळे हिंदुत्वाची त्वचा आणि शाल यांची तुलना होऊच शकत नाही, असे वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी केले. (Ashish Shelar criticized CM Uddhav Thackeray dussehra rally speech)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी दसरा मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाचा दाखल देत भाजपच्या नेत्यांना टोले लगावले होते. हिंदुत्व हे पूजाअर्चा किंवा मंदिरापर्यंत मर्यादित नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. या टीकेला आशिष शेलार यांनी सोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व भेसळयुक्त झाले आहे. त्यांना आमच्याकडून आणि काळ्या टोपीकडून हिंदुत्वाचं सर्टिफिकेट घ्यावे लागले. तसेच टाळ्या आणि थाळ्यांचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नव्हता. ते केवळ कोरोना योद्ध्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी करण्यात आले होते, असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला संबोधित करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आम्हाला कुणीही हिंदुत्व शिकवू नये. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. तुमच्यासारखं सोयीचं हिंदुत्व आम्ही मिरवत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला होता.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज दसऱ्या मेळाव्याच्या भाषणात हिंदुत्वाचा अर्थ समजून सांगितला. भागवतांना मानणारे लोक असतील तर त्यांनी नुसती काळी टोपी घालू नये. त्या टोपीखाली डोकं असणाऱ्यांनी थोडा विचारही केला पाहिजे. हिंदुत्व समजून घेतलं पाहिजे. हिंदुत्वाबाबत काही लोक भ्रम पसरवित आहेत. हिंदुत्वाचा अर्थ पूजेशी जोडून संकुचित करत आहेत, असं भागवत म्हणाले. त्यामुळे भागवतांनी सांगितलेला हा अर्थ समजून घ्या, असा टोला उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपला नाव न घेता लगावला.
मला हिंदुत्वाबद्दल प्रश्न विचारले जात आहे. मंदिर उघडत नाही म्हणून मला हे प्रश्न विचारले जात आहेत. याद राखा, वाघाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर फटका मारणारच. तुम्हाला जर फटका मारून घ्यायचाच असेल तर जरूर या, असं आव्हान देतानाच बाबरी पडली तेव्हा कुठल्या बिळात शेपट्या घालून पडले होते? ज्यांचं नाव कुणालाही माहीत नव्हतं ते लोक मला हिंदुत्वाबाबत विचारत आहे, असं सांगतानाच कोरोना आला की घंटा बडवा, थाळ्या वाजवा हेच तुमचं हिंदुत्व. इकडे गाय म्हणते माता आणि पलिकडे जाऊन खाता हेच का तुमचं हिंदुत्व?, असे टोलेही त्यांनी लगावले होते.
संबंधित बातम्या:
काळी टोपी घालणाऱ्यांनो, सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्या; उद्धव ठाकरेंचा हल्ला
इकडे गाय म्हणजे माता, पलिकडे जाऊन खाता; हे तुमचं हिंदुत्व?: उद्धव ठाकरे
काळी टोपी घालणारे सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड करत नाहीत; भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
(Ashish Shelar criticized CM Uddhav Thackeray dussehra rally speech)