साताऱ्यात भाजपला धक्का, महत्त्वाचा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार
सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यापासून दीपक पवार नाराज होते. यापूर्वी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन शिवेंद्रराजेंना विरोधही केला होता.
सातारा : भाजपला सातारा जिल्ह्यात मोठा धक्का बसणार आहे. साताऱ्याचे नेते आणि पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पवार (Satara Deepak Pawar) राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. येत्या 22 तारखेला ते (Satara Deepak Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करतील. सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यापासून दीपक पवार नाराज होते. यापूर्वी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन शिवेंद्रराजेंना विरोधही केला होता.
शिवेंद्रराजे भोसले यांचं भाजपात इनकमिंग झाल्यानंतर दीपक पवार यांनी बंडाचा झेंडा फडलवला होता. यानंतर दिपक पवार यांना एक महामंडळ देऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण दीपक पवार यांनी महामंडळ धुडकावत भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपात प्रवेश करतोय असं जाहीरपणे सांगत शिवेंद्रराजेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता. गेल्या पाच वर्षात मी विरोधी पक्षात असल्यामुळे माझ्या मतदारसंघातील प्रश्नांना न्याय मिळाला नाही. लोकसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचं सरकार येईल अशी परिस्थिती राहिलेली नाही ही वस्तूस्थिती आहे. अजून पाच वर्ष विरोधात राहून माझ्या मतदारसंघाचं नुकसान करायचं हे मला लोकप्रतिनिधी म्हणून पटत नाही, असंही त्यांनी सांगितलं होतं.