Devendra Fadanvis | देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला, नवी समीकरणं काय? मनसेच्या एकमेव आमदाराची लॉटरी लागणार?
राज्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत न घेता सरकार स्थापन करतानाच भाजपतर्फे मनसेशी जवळीक साधली जात आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही नवी खेळी असू शकते, असे म्हटले जात आहे.
मुंबईः उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेला भगदाड पाडल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलत आहेत. यातच आत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याचे आडाखे बांधले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतल्यानंतर आता संपूर्ण राज्याला मंत्रिमंडळ विस्ताराची अपक्षे आहे. भाजपशी सलगी केल्यानंतर शिंदे गटातील आमदारांना कोणती खाती मिळतात, याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका लक्षात घेता भाजपदेखील सावधगिरीने पावलं टाकत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज घेतलेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मुंबईत आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास देवेंद्र फडणीस यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली.
मनसेला मंत्रिपद?
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मनेसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना भाजपच्या कोट्यातून मंत्रिपद मिळण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तवण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस याच मुद्द्यावरून राज ठाकरेंना भेटणार असल्याच्याही चर्चा होत्या. मात्र ही भेट काही दिवसांपासून लांबणीवर पडली होती. आज शुक्रवारी अखेर फडणवीस शिवतीर्थावर दाखल झाले. राज ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली. मात्र या भेटीत नेमकं काय घडलं, हे अद्याप समोर आलेलं नाही. मंत्रिपदाविषयी आमदार राजू पाटील यांनी काल प्रतिक्रिया दिली. आम्ही कोणत्याही अपेक्षेने भाजपाला पाठिंबा दिलेला नाही. मात्र सभागृहात संधी मिळाली तर त्याचं स्वागतच करू, असे ते म्हणाले.
राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस
एकनाथ शिंदेगट आणि भाजप या दोघांच्या समन्वयातून महाराष्ट्रात नुकतंच सत्तांतर झालं. यावेळी राज ठाकरे यांनी नव्या सरकारला पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या . राज ठाकरे यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांनी पत्राद्वारे नवीन सरकारला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या शुभेच्छांचा स्वीकार करत आम्ही एकदा थेट भेटायला जाणार आहोत, असं म्हटलं होतं. त्यामुळे या भेटीत राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्याचा उद्देश होता, असं सांगण्यात येत आहे. मात्र यापुढेही काहीतरी राजकीय हेतू असल्याचाही संशय राजकीय वर्तुळातून व्यक्त होतोय.
मनसेशी जवळीक वाढतेय?
महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यापासून भाजप आणि मनसेची जवळीक वारंवार पहायला मिळत आहे. त्यानंतर राज्यात गेल्या महिन्यात घडलेल्या राजकीय घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वारंवार समाधानकारक प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे कुठे तरी भाजपच्या या सर्व खेळींना मनसेचा पाठींबा असल्याचं दिसून येतंय. राज्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत न घेता सरकार स्थापन करतानाच भाजपतर्फे मनसेशी जवळीक साधली जात आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही नवी खेळी असू शकते, असे म्हटले जात आहे.