Maharashtra politics : मोदी, शाहांचे फोटो लावून मतं मागितले; नाहीतर दोन खासदारही निवडून आले नसते, महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला
भाजप (BJP) नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधला आहे. गेल्या निवडणुकीत भाजपामुळेच शिवसेनेचे आमदार, खासदार निवडून आल्याचे महाजन यांनी म्हटले आहे.
जळगाव : भाजप (BJP) नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधला आहे. आम्ही शिवसेना संपवण्याचं काम करत नाही. तुम्ही गेल्या निवडणुकीला आमच्या सोबत होते म्हणून तुमचे 55 आमदार निवडून आले. नाही तर 15 तरी आले असते का? तुम्ही अमित शाह आणि मोदींचा फोटो लावून मतं मागितले म्हणून तुमचे 15 खासदार निवडून आले. नाहीतर तुमचे दोन तरी खासदार निवडून आले असते का? हे तुम्ही तुमच्या छातीवर हात ठेवून सांगा असे म्हणत महाराजन यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. गेल्या निवडणुकीत आपण भाजप सेना युती म्हणून एकत्र लढलो होते. जनतेने स्पष्ट बहुमत देखील दिले होते. मात्र तुम्हाला दुर्बुद्धी सूचली, तुम्ही भाजपला सोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आणि तेव्हापासूनच तुमचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचे महाजन यांनी म्हटले आहे.
खुर्चीची हवा डोक्यात गेली
पुढे बोलताना महाजन यांनी म्हटलं की, तुम्ही सत्तेत आलात आणि खुर्चीची हवा तुमच्या डोक्यामध्ये गेली. कोणालाही तुम्हाला भेटण्यास वेळ नव्हता. तुम्ही स्वतः कोणतेही निर्णय घेतले नाही. दुसऱ्याच्या म्हणण्यावर तुम्ही चालले. दुसऱ्या नेत्याच्या म्हणण्यावर तुम्ही चाललात म्हणून ही वेळ तुमच्यावर आली. तुम्ही तुमच्या मूळ हेतूपासून बाजूला गेलातं, म्हणून सर्व आमदार तुमच्यावर नाराज झाले आहेत. त्या परिणामाचा परिपाक म्हणजे ही 40 आमदारांनी केलेली बंडखोरी होय. तुम्ही तेव्हाच जर आमच्या सोबत राहिला असतात तर सर्व योग्यपद्धतीने चालले असते. मात्र आता तुमचं चिन्ह असलेलं धनुष्यबाण तुम्हाला परत भेटेल की नाही यांची चिंता असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे.
खडसेंवर निशाणा
दरम्यान त्यांनी यावेळी बोलताना एकनाथ खडसे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. खरंतर खडसेंना असं वाटत होतं आपण मंत्री होऊ. मात्र सर्व गोष्टी या मनासारख्या होत नाहीत. खडसेंनी विधान परिषदेत शपथ घेतली आणि इकडे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.
त्यामुळे आता खडसेंना आमदाराकीवरच समाधान मानावे लागेल. मंदिरात गेले आणि प्रसाद संपला. नंतर बाहेर आले तर चप्पल देखील चोरी झाली, अशी अवस्था खडसेंची झाल्याचे महाजन यांनी म्हटले आहे.