मनसे आणि भाजप समविचारी, मनसेच्या झेंड्याच्या अनावरणानंतर गिरीश महाजनांकडून युतीचे संकेत
विषम विचारी पक्ष एकत्र येत असतील, मग आम्ही तर समविचारी आहोत, असं म्हणत गिरीश महाजनांनी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला लगावला.
मुंबई : मनसे आणि भाजप समविचारी पक्ष आहेत, असं म्हणत भाजपचे संकटमोचक नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मनसे-भाजप युतीचे संकेत दिले आहेत. भविष्यात काहीही अशक्य नसल्याचंही महाजन (Girish Mahajan on MNS BJP) म्हणाले.
मनसेने जो झेंडा घेतला आहे, त्यामध्ये हरकत घेण्यासारखं काही वाटत नाही. आमचे मित्रपक्ष झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो घेऊन फिरतात. मनसेने फक्त झेंड्याची काळजी घ्यावी, असं गिरीश महाजन यांनी सुचवलं.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विषम विचारी पक्ष एकत्र येत असतील, मग आम्ही तर समविचारी आहोत, असं म्हणत गिरीश महाजनांनी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला लगावला.
काही बाबतीत मतभेद असले, तरी भविष्यात मतं जुळली तर काहीही अशक्य नाही. दोघांमध्ये एकवाक्यता झाली, तर एकत्र येऊ शकतो, लोकांना ते आवडेल. मनसे आणि भाजप एकाच मताचे आहेत, काहीही अशक्य नाही, असे संकेतही गिरीश महाजनांनी दिलं.
भगव्या झेंड्यावर राजमुद्रा, राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. मनसेचा नवा ध्वज भगव्या रंगाचा असून त्यावर मध्यभागी राजमुद्रा आहे. महाअधिवेशनाच्या सुरुवातीलाच मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करुन राज ठाकरेंनी पक्ष कात टाकत असल्याचे संकेत दिले आहेत.
मनसेच्या महाअधिवेशनासाठी गोरेगावातील नेस्को ग्राऊण्डवर राज ठाकरे हे मातोश्री कुंदा ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे, सून मिताली ठाकरे आणि कन्या उर्वशी ठाकरे यांच्यासह सकाळी नऊ वाजताच दाखल झाले. त्यानंतर सव्वादहा वाजताच्या सुमारास मनसेच्या झेंड्याचं राज ठाकरेंनी अनावरण केलं. त्यानंतर पारंपरिक गोंधळ नृत्य सादर करत अधिवेशनाला सुरुवात झाली.
मनसेने तीन रंगाचा जुना झेंडा बदलून भगव्या रंगाचा ध्वज धारण केला आहे. यातून मनसे हिंदुत्ववादी विचारांची कास धरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सुलेखनकार अच्युत पालव यांनी मनसेच्या झेंड्याचं डिझाईन केल्याचं बोललं जात आहे. संभाजी ब्रिगेडसह काही संघटनांनी राजमुद्रा वापरण्यास केलेला विरोध झुगारुन मनसेने नवा झेंडा घेतला आहे.
मनसेच्या महाअधिवेशनसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. सभेच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मनसेच्या नेत्यांनी नाराज शिवसैनिकांनाही मनसेत सामील होण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे महाअधिवेशनात मनसेमध्ये कार्यकर्ते आणि नेत्यांची मेगाभरती होणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
Girish Mahajan on MNS BJP