ठाणे : खंडणी प्रकरणात फरार असलेले ठाणे महापालिकेतील भाजपचे गटनेते नारायण पवार यांनाी अखेर पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं (BJP Leader Narayan Pawar Arrest). कासारवडवली पोलिसांनी पवार यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नारायण पवार यांच्यावर तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे (BJP Leader Narayan Pawar Arrest).
हे प्रकरण 2015 चं आहे. या प्रकणी नारायण पवार यांच्यासोबत एकूण चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी संगनमत करुन जमिनीची कागदपत्रे तयार केली. या कागदपत्रांच्या आधारे ठाणे महापालिकेत अर्ज करून बिल्डरकडे तीन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप पवार यांच्यावर आहे. तसेच, तीन लाख रुपये स्वीकारले असल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. या आरोपानंतर ठाण्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी नारायण पवार हे काँग्रेसचे नगरसेवक होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या ते ठाणे महापालिकेत भाजपचे गटनेते आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर नारायण पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. त्यानंतर त्यांनी पुन्हा ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. मात्र, ठाणे न्यायालयानेही त्यांचा अर्ज फेटाळून लावल्याने पवार फरार झाले. कासारवडवली पोलीस आणि खंडणी विरोधी पथक पवारांचा शोध घेत होते. दरम्यान, सोमवारी (10 फेब्रुवारी) त्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात शरणागती पत्कारली.