अर्णव गोस्वामींच्या जिवाला धोका निर्माण झाल्यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार- नारायण राणे
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका झाल्यास, त्याची जबाबदार महाविकास आघाडी सरकारची राहिल", असं ट्वीट करत नारायण राणे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
मुंबई: रिपब्लिक टीव्हीचे संचालक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजप नेते नारायण राणे यांनी राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. राज्य सरकार आणि पोलिसांकडून गोस्वामी यांचा शारीरिक छळ सुरु असल्याचा गंभीर आरोपही राणे यांनी केला आहे. अर्णव गोस्वामी यांना आज अलिबागहून तळोजा कारागृहात हलवण्यात आलं आहे. त्यावेळी आपल्याला पोलिसांनी वारंवार मारहाण केल्याचा आरोप अर्णव गोस्वामी यांनी केला आहे. त्यानंतर राणे यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय. (BJP leader Narayan Rane criticize Thackeray government on Arnav Goswami)
“अर्णव गोस्वामी यांचे प्रकरण उच्च न्यायालयात असूनही वारंवार वेगवेगळ्या तुरुंगात हलवून त्यांचा शारीरिक छळ राज्य सरकार आणि पोलिसांना चालवला आहे. राज्य सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होतेय. गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका झाल्यास, त्याची जबाबदार महाविकास आघाडी सरकारची राहिल”, असं ट्वीट करत नारायण राणे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
#ArnabGoswami यांचे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये असूूूूनही वारंवार वेगवेगळया तुरुंगात हलवून त्यांचा शारीरिक छळ राज्य सरकार व पोलिसांनी चालवलाय. राज्य सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होतेय. गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका झाल्यास, त्याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल. pic.twitter.com/BSH79hpNOh
— Narayan Rane (@MeNarayanRane) November 8, 2020
अर्णव गोस्वामींना मोबाईल पुरवण्यात आला?
अलिबागच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये पोलीस सुरक्षेला गुंगारा देत एका व्यक्तीने अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांच्यापर्यंत मोबाईल पोहोचवल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या मोबाईलवरुन अर्णव गोस्वामी यांनी एक फोन केल्याचेही समजते. सध्या पोलिसांकडून या सगळ्याची अंतर्गत चौकशी सुरु आहे. मात्र, भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी अर्णव गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलवण्यात आल्याचे सांगितलं जात आहे.
अर्णव आणि मुंबई पोलिस समर्थकांची घोषणाबाजी
अर्णव गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी तळोजा कारागृहात हलवलं आहे. तेव्हा कारागृहासमोर अर्णव गोस्वामी आणि मुंबई पोलिसांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. अर्णव यांना तळोजा कारागृहात घेऊन जाताना दोन्ही बाजूच्या समर्थकांनी मोठी घोषणाबाजी केली. त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करुन दोन्ही बाजूच्या समर्थकांना बाजूला केल्यानं संभाव्य वाद टळला.
दरम्यान, अर्णव गोस्वामी यांच्या तातडीच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालय सोमवारी निर्णय देणार आहे. त्यामुळे अर्णव यांना जामीन मिळणार की त्यांना कोठडीतच राहावं लागणार हे उद्या स्पष्ट होईल. उद्याही अर्णव गोस्वामी यांना जामीन मिळाला नाही तर त्यांचा कारागृहातील मुक्काम वाढण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या:
अर्णव गोस्वामींच्या सुटकेनंतरच दिवाळी साजरी करू; राम कदम यांची सिद्धिविनायकापर्यंत पदयात्रा
तळोजा कारागृहाबाहेर अर्णव समर्थक आणि महाराष्ट्र पोलीस समर्थकांचा ‘सामना’, जोरदार घोषणाबाजी
BJP leader Narayan Rane criticize Thackeray government on Arnav Goswami