भाजपची सत्ता गेलेली नाही, सत्ता ‘ऑन द वे’ असून केव्हाही येईल : नारायण राणे
महाराष्ट्रात झालेल्या सत्तापालटाचा घटनाक्रम अनेकांना अविश्वसनीय वाटणारा ठरला (Narayan Rane on BJP government Formation).
रत्नागिरी : महाराष्ट्रात झालेल्या सत्तापालटाचा घटनाक्रम अनेकांना अविश्वसनीय वाटणारा ठरला (Narayan Rane on BJP government Formation). आता सरकार स्थापन होऊन भाजपवर विरोधपक्षात बसण्याची वेळ आलेली असतानाही भाजपचे अनेक नेते भाजपची सत्ता येणार असा दावा करत आहेत. भाजपची सत्ता गेलेली नाही. सत्ता ऑन द वे आहे. आमची सत्ता केव्हाही येईन. मी यासंदर्भात आशावादी आहे, असं मत भाजप नेते नारायण राणे यांनी व्यक्त केलं (Narayan Rane on BJP government Formation).
भाजपच्या अनेक नेत्यांच्या सातत्यपूर्ण वक्तव्यांवरुन त्यांचा अद्यापही सत्तेतून पायउतार झाल्यावर विश्वास बसलेला दिसत नाही. नारायण राणेंनी देखील असाच काहीसा दावा केल्याने पुन्हा एकदा याची चर्चा होत आहे. राणे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच शिवसेना सत्तेवर असली तरी खरी सत्ता शिवसेनेकडे नसून राष्ट्रवादीकडे असल्याचा दावाही राणेंनी केला.
“मुख्यमंत्री जयंत पाटील आहेत की उद्धव ठाकरे?”
नारायण राणे यांनी सरकारवर टीका करताना या सरकारमध्ये मुख्यमंत्री जयंत पाटील आहेत की उद्धव ठाकरे असा सवालही केला. ते म्हणाले, “या सरकारमध्ये मुख्यमंत्री जयंत पाटील आहेत की उद्धव ठाकरे? सर्व प्रश्नांची उत्तरं जयंत पाटीलच देत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दालनात उद्धव ठाकरेंच्या बाजूला जयंत पाटलांची खुर्ची आहे. त्यांना सत्तेत चान्स मिळाला नसता, तर भाजप-सेना सत्तेवर असती.”
सुभाष देसाईंकडे युतीची सत्ता असतानाही उद्योगमंत्रिपद होते. आताही त्यांच्याकडं हेच खातं दिलं आहे. त्यामुळे उद्योग तेच चालू करतात आणि तेच बंद करतात. यालाच शिवसेना म्हणतात, असाही टोला राणेंनी लगावला.
नारायण राणे म्हणाले, “शिवसेनेचा मुख्यमंत्री नामधारी आहे. ते विचारलेल्या प्रश्नावर उत्तरही देऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांना प्रशासनही माहिती नाही. शिवसेनेने 10 रुपयांमध्ये खास थाळी सुरु केली. मात्र, उद्धव ठाकरे घरी जे खातात तेच जेवण 10 रुपयांच्या थाळीत देणार आहेत का? मुंबई महानगरपालिकेने मुंबईत कामगारांसाठी 10 रुपयांची थाळी योजना सुरु केली. पण या योजनेत सबसीडी आहे. यात उद्धव ठाकरेंचं योगदान काय? तुमच्या आमच्या खिशातूनच हे पैसे तिकडे जातात.”
शिवसेनेने भष्ट्राचारावर बोलू नये. मी त्यांच्या भ्रष्टाचाराचा पाढाच वाचेन, असाही इशारा राणे यांनी दिला.