पंकजा मुंडेंना पुन्हा ‘दे धक्का’, बीड जिल्हा परिषदेच्या चारही सभापती पदावर राष्ट्रवादीचा कब्जा
भाजपची एक हाती सत्ता असलेल्या बीड जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा आपले वर्चस्व (Dhananjay Munde vs Pankaja Munde) निर्माण केलं.
बीड : भाजपची एक हाती सत्ता असलेल्या बीड जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा आपले वर्चस्व (Dhananjay Munde vs Pankaja Munde) निर्माण केलं. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीतही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाने माजी मंत्री पंकजा मुंडेंना धक्का दिला. त्यानंतर आता पुन्हा जिल्हा परिषदेच्या चारही सभापती पदावर धनंजय मुंडेंनी विजय मिळवला. बहिण भावाच्या लढतीत भावाने पुन्हा एकदा बाजी मारल्याने जिल्ह्यातील राजकारणाला नवं वळण (Dhananjay Munde vs Pankaja Munde) मिळालं आहे.
बीड जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्या बळ असतानाही पंकजा मुंडेंनी जादूची कांडी फिरवत, जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवला होता. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या राजकारणाची कूस बदलली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना जोरदार धक्का देत जिल्हयात वर्चस्व निर्माण केलं आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर राष्ट्रवादीने आपले अस्तित्व सिद्ध केल्यानंतर, आता पुन्हा सभापती पदावरही राष्ट्रवादीचे चार सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
जिल्हा परिषदेत भाजपचे पुरेसे संख्याबळ नसताना देखील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना फोडून पंकजा मुंडेंनी संख्याबळ उभारून जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकावला होता. मात्र जेव्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि पंकजा मुंडेंचं अस्तित्व हळूहळू धोक्यात आल्याचं पाहायला मिळालं. विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव झाल्यानंतर सत्तेची सगळी सूत्र धनंजय मुंडे यांच्या हाती आली आहेत. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी देखील याची कबुली दिली.
विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद आणि सभापती पद एवढंच नाही तर जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्या धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आल्या आहेत. त्यामुळे आता बीड जिल्ह्यात धनंजय पर्व दिसू लागलं आहे.