अहमदनगरः महाराष्ट्रात ज्या घडामोडी घडतायत त्यावरून महाराष्ट्र राजकीय भूकंपाच्या दिशेने वाटचाल करतोय, असंच दिसतंय. पण सध्या तरी यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दिली आहे. विधान परिषदेची (MLC Election) उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर नाराज पंकजा मुंडे अनेक दिवसांपासून मौनात होत्या. कार्यकर्त्यांची अस्वस्थता दिसत होती. पण पंकजांची प्रतिक्रिया बाहेर आली नव्हती. या नाट्यमय घडामोडींनंतर आज प्रथमत पंकजा मुंडे थेट कार्यकर्त्यांमध्ये आल्या. पंकजा मुंडे आज बीडमधील आष्टी आणि अहमदनगरमधील (Ahmednagar) पाथर्डी दौऱ्यावर होत्या. या दोन्ही ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज होऊन एका कार्यकर्त्याने विषप्राशन केलं होतं. त्याच्या भेटीसाठी पंकजा मुंडे पाथर्डीत पोहोचल्या. मुकुंद गर्जे असं या कार्यकर्त्याचं नाव असून पंकजाताईंनी त्याची भेट घेऊन पुन्हा असे प्रयोग करू नका, अशी विनंती केली. यावेळी सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींबद्दलही त्यांनी भाष्य केलं. सध्या तरी महाराष्ट्रातील यंत्रणेत मी नसल्यामुळे या विषयावर भाष्य करणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया देत पंकजा मुंडेंनी बोलणं टाळलं.
शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत, याबद्दल मी फारसं बोलू शकत नाही. आज मी बाहेरच आहे. पण महाराष्ट्रातील घडामोडी माझ्या कानावर येत असून हा महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
भाजप नेतृत्वाकडून वारंवार डावलण्यात येणाऱ्या पंकजा मुंडे यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. भाजपने पंकजांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यानंतर शिवसेनेनं त्यांच्याबद्दल सहानुभूती दर्शवली होती. तर काहींनी त्यांना शिवसेनेत आमंत्रण दिलं होतं. एमआयएमनंही त्यांना स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता. यानंतर आज प्रथमच पंकजा मुंडे माध्यमांना सामोरे गेल्या. यावेळी त्या मौन सोडतील, अशी अपेक्षा सर्वांना होता. मात्र टीव्ही 9 नं याविषयी विचारलेल्या प्रश्नाला प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडेंनी एक सूचक हास्य केलं. आता पाथर्डी येथील मोहटा देवीचं दर्शन घेणार आणि त्यानंतरच काही भूमिका घेईन, असं वक्तव्य पंकजांनी केलं.
पाथर्डी येथील दौऱ्यात पंकजा मुंडे यांनी विषप्राशन करून आत्महत्या करणाऱ्या कार्यकर्त्याची भेट घेतली. पंकजा मुंडे यांना विधान परिषद निवडणुकीची संधी नाकारण्यात आल्यानंतर मुकुंद गर्जे या कार्यकर्त्याने विष प्राशन करून आत्महत्या कऱण्याचा प्रयत्न केला होता. त्याची भेट घेऊन आज पंकजा मुंडे यांनी, यापुढे असे प्रकार कुणीही करू नका, अशी विनंती केली. त्या म्हणाल्या , माझ्यावर कार्यकर्त्यांचं प्रेम असणं ही माझी शक्ती आहे. असं कुणी स्वतःवर असे प्रयोग कुणीही करू नये. आपला जीव धोक्यात घालू नये, असं मला वाटतं. मी आज आल्या आल्या प्रेमानं मोहनला फटकारलं. मी रागावले, असं कुणीही करू नये, असं मला वाटतं.