मुंबईः शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची वक्तव्य वैफल्यग्रस्ततेतून येत आहे. टोमणे मारणं हा तर त्यांचा स्थायी भाव आहे. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कारटं, अशीच त्यांची वर्तणूक असते, अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे सरकारवर (CM Eknath Shinde) उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथील एका कार्यक्रमात जोरदार टीका केली. मुंबई इलेक्ट्रॉनिक्स वर्कर्स युनियनच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे की चोरबाजार… किती काळ राहतील ते त्यांनाही माहिती नाही… यावरून भाजप नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. विधान परिषद नेते भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आज विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.
उद्धव ठाकरे यांचं भाजपविरोधी वक्तव्य हे वैफल्यग्रस्ततेतून आलंय. शिवसेनेत अभूतपूर्व फुट पडल्यामुळे त्यांना निराशा आली आहे. त्यातच टोमणे मारणं हा त्यांचा स्थायी भाव आहे. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशी त्यांची वृत्ती आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.
उद्धव ठाकरे मुंबईतील कार्यक्रमात म्हणाले, सध्या 50 खोके एकदम ओके.. ही घोषणा व्हायरल होतेय. लोकं सर्रास चिडवत आहेत. घरोघरी जसे दिवे लागतात, तसे या काळ्या कारभारावरही तुम्ही घरोघरी जाऊन प्रकाश टाकला पाहिजे. हे कोणतं सरकार आहे? म्हणजे खोके सरकार… आमचं तीनचाकी होतं, तुमचं दुचाकी, नावं एकत्र केली तर ईडी सरकार…. ही कुठली लोकशाही आहे? लॉकडाऊनच्या काळात आपण असंख्य कामं केली. अनेक कोटींच्या गुंतवणुकीचे करार केले. कागदावरून ते जमिनीवर आणले. पण हे सरकार ते स्थगित करत आहे. या सरकारचा जन्मच खोक्यातून झाला…
भाजप आणि शिंदे गटावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ सत्ता कशासाठी पाहिजे? लोकशाहीचा खून केला म्हणाले…. आम्ही जे केलं ते पाप, त्यांनी केलं ते सगळं ओक्के… मुंबई निवडणूक जवळ आली आहे. सगळ्या मुंबईकरांशी तुमचा संपर्क येतो. दिल्ली मिळाली, पण मुंबई पाहिजेच, अशी त्यांची भूमिका आहे. 25 वर्ष भाजपबरोबर युतीत सडली. मुंबई महाराष्ट्रात बाळासाहेबांशिवाय मतं मिळू शकत नाहीत, हे त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांच्या विचारांतला महाराष्ट्र बनवायचंय, असे म्हणतात. मुंबईत मेट्रो हे त्यांचं स्वप्न होतं? मुंबई-महाराष्ट्रात मोदींचं नाव चालत नाही. त्यामुळे बाळासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय त्यांना चालत नाही. दुसऱ्या पक्षातून आमदार, खासदार, स्वप्न चोरायचे… तुमचा पक्ष आहे की चोरबाजार..?