ठाकरे गटाची मोठी कोंडी, उद्या आणखी एक ‘बॉम्ब’ पडणार? अंबादास दानवेंचं पद धोक्यात?
विधानसभेत आज शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. यावरून प्रविण दरेकर यांनी टीका केली.
मुंबई : एकिकडे सुप्रीम कोर्टात (Supreme court) शिवसेना (Shivsena) आमदारांच्या अपात्रतेचा आणि एकनाथ शिंदे सरकारचाच प्रश्न प्रलंबित असताना बाहेर मात्र प्रचंड नाट्यमय घडामोडी घडत आहेत. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि नाव देण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकनाथ शिंदे गट आक्रमक झाला आहे. पक्ष म्हणून जे जे काही हाती घेता येईल, ते ते अग्रक्रमाने करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात येतोय. विधिमंडळातील कार्यालयापासून इतर महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये बदल करण्यात येतोय. ठाकरे यांच्या आमदारांना ज्याची भीती होती, तो व्हिपदेखील शिंदे गटाकडून लागू करण्यात आला आहे. आता उद्या ठाकरे गटासाठी आणखी एक आव्हान उभं ठाकणार आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचं पद धोक्यात आलं आहे. भाजप नेते प्रविण दरेकर यांनी यासंबंधीचं सूतोवाच केलं.
अंबादास दानवे नेमके कोण?
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या पदावरून भाजप नेते प्रविण दरेकर यांनी आक्षेप घेतला आहे. शिवसेना पक्षाच्या चिन्हावर ते निवडून आलेले असताना विरोधी पक्षनेते कसे राहू शकतात, असा सवाल त्यांनी विचारला. आज माध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी हा प्रश्न विचारला आणि उद्या सभागृहात हा मुद्दा उचलून धरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रविण दरेकर म्हणाले, ‘अंबादास दानवे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. कारण शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आहे. धनुष्यबाणी हे त्यांचं आहे. सत्ताधारी पक्षाचा आमदार विरोधी पक्षनेता कसा होऊ शकतो. त्यामुळे अंबादास दानवे कोण आहेत? विरोधी पक्ष नेते आहेत? साधे सदस्य आहेत? की ठाकरे गटाचे सदस्य आहेत? हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर येण्याची आवश्यकता आहे, हा प्रश्न मी उद्या उपस्थित करणार आहे, असा इशारा प्रविण दरेकर यांनी दिला.
विरोधकांची मांडणी बालिश’
विधानसभेत आज शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. यावरून प्रविण दरेकर यांनी टीका केली. ते म्हणाले, ‘ विरोधकांनी आज शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचं केविलवाणा प्रयत्न दाखवला. त्यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. राज्याचे मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री संवेदनशील आहेत. त्यामुळे त्यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली. कांदा उत्पादकांची सद्यस्थिती आणि सरकार काय करणार आहे, हे मांडत असताना त्यांच्या भाषणात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचं भाषण पूर्ण केला असता तर शेतकऱ्यांचं समाधान झालं असतं. विरोधकांची मांडणी बालिशपणाची होती. कारण नसताना आव आणून घोषणा देत बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांना दिखावा करायचा होता.