जालना: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेविरोधात (Shiv Sena) बंड केले आहे. शिवसेनेमधील एका मोठ्या आमदारांच्या गटाने एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. आपल्याला शिवसेनेच्या जवळपास 40 पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसेच त्यांनी 38 आमदांराची सही असलेले पाठिंब्याचे पत्र सादर देखील केले आहे. आता या सर्व प्रकरणावर भाजपाचे नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील सरकार अस्थिर करण्यामागे भाजपाचा हात नसून, शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळे हे सरकार अस्थिर बनल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील जनतेने 2019 साली भाजप -शिवसेना युतीला स्पष्ट बहुमताचा कल दिला होता. मात्र तसे असताना देखील शिवसेनेने भाजपाची साथ सोडून काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. शिवसेनेला जनतेचे प्रश्न सोडवता आले नाही. आमदारांमध्ये असंतोष होता, त्यामुळे शिवसेनेत फूट पडल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्यात आज जी अस्थिरता निर्माण झाली आहे, ती भाजपामुळे निर्माण झाली नसून त्याला शिवसेनाच जबाबदार आहे. 2019 साली जनतेने भाजपाला स्पष्ट बहुमत दिले होते. मात्र शिवसेनेने भाजपाकडे मुख्यमंत्रीपदाची मागणी केली. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा निवडणूक प्रचाराला आले त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील असे सांगितले होते. परंतु त्यावेळी शिवसेनेने त्यावर कोणताही अक्षेप घेतला नाही. मात्र जेव्हा आपल्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी, काँग्रेससोबत आघाडी करून सरकारची स्थापना केली. मात्र हे सरकार जनतेला मान्य नव्हते.
सध्याची परिस्थिती पहाता हे सरकार अल्पमतात आहे. त्यामुळे अल्पमतातील सरकारने आता राजीनामा द्यावा अशी मागणी देखील रावसाहेब दानवे यांनी केली आहे. गेले अडीच वर्ष उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत, मात्र त्यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारला जनतेचे प्रश्न सोडवता आले नाही. राज्य सरकारने त्याचे खापर केंद्रावर फोडले. आमदारांमध्ये देखील रोष होता. त्यामुळे सरकार अस्थिर झालेच्या दानवे यांनी म्हटले आहे.