राज ठाकरे यांनी आधी मोदी यांच्यावरील टीकेचं उत्तर द्याव, मगच युती; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा युतीला कडाडून विरोध
ज्यांनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. त्यांच्यासोबत जाऊच कसे शकतो? अशा लोकांबरोबर जाण्याची गरज नाही.
पुणे: एकीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) आणि भाजप (bjp) नेत्यांच्या गेल्या काही महिन्यांपासून भेटीगाठी सुरू आहेत. त्यामुळे मनसे (mns) आणि भाजपची युती होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. या चर्चांवर भाजपकडून शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही. पण मनसे-भाजप युतीला कोणीही विरोध केलेला नाही. मात्र, आता भाजपमधून पहिल्यांदाच या युतीला विरोध करण्यात आला आहे. भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी या युतीची गरज नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
भाजपचे नेते, माजी खासदार संजय काकडे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेवरच बोट ठेवत युतीला विरोध केला. भाजप – मनसे युतीची आम्हाला गरज नाही. पक्षाने जर तसा निर्णय घेतला तर माझा या युतीला विरोध असणार आहे, असा इशाराच संजय काकडे यांनी केला आहे.
ज्यांनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. त्यांच्यासोबत जाऊच कसे शकतो? अशा लोकांबरोबर जाण्याची गरज नाही. मोदींवरील टीकेबाबत राज ठाकरे यांनी आधी उत्तर द्यावे, मगच पुढे बोलू, असंही त्यांनी म्हटलं आहे.
संजय काकडे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी मनसे ही शिवसेनेची बी टीम असल्याचं म्हटलं आहे. गरज पडली तर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ. शिवसेना आमचा पारंपारिक मित्रं आहे. शिवसेनेसोबत जाणं कधीही योग्यच आहे, असं मोठं विधानही त्यांनी केलं आहे.
मनसेबरोबर युती करण्यास माझा विरोध आहे. हा विरोध मी माझ्या वरिष्ठांना कळवणार आहे. ही युती का होऊ नये याची माहितीही देणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. काकडे यांनी थेट आणि रोखठोक भूमिका घेतल्याने मनसे आणि भाजपची युती होणार का? असा सवाल निर्माण झाला आहे.
भाजप आणि मनसेच्या नेत्यांच्या गेल्या काही दिवसांपासून गाठीभेटी सुरू झाल्या होत्या. त्यामुळे मनसे आणि भाजप महापालिका निवडणुकीत एकत्र येऊ शकते असं सांगितलं जात होतं. या चर्चा सुरू असताना दोन्ही पक्षांकडून एकमेकांना पुरक अशी विधाने केली होती. मात्र, आता मध्येच भाजपमधूनच या युतीला विरोध होऊ लागल्याने मनसे-भाजप युतीला ग्रहण लागणार असल्याचं चित्रं आहे.