मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाने (BJP) सत्ता स्थापनेचा दावा केला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर विशेष अधिवेशन बोलवण्यात आले. आज या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर विधानभवनात चांगलीच खडाजंगी रंगल्याचे पहायला मिळाले. विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी एकोंमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप केले. यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी मविआच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. बहुमताने सरकार आले आणि रडण्याचा कार्यक्रम सुरू झाला अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच त्यांनी यावेळी नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक देखील केलं आहे. पाहुयात नेमकं काय म्हणाले मुनगंटीवार.
आज सत्याचा विजय झाला आहे. बहुमताने सरकार आल्यानंतर लगेच रडण्याचा कार्यक्रम सुरू झाला. या सरकारने हिंदुत्वाचा अपमान केला आहे. रामाला काल्पनिक म्हणाऱ्यांसोबत तुम्ही आघाडी केली. मात्र आता पुन्हा एकदा भाजपाचे सरकार आले आहे. आम्ही भगवा हातात घेतला आहे. मात्र तुम्हाला भगव्याचा अर्थ समजणार नाही. हा वासनारहित भगवा आहे. काही लोकांनी तर आतापासूनच माजी आमदार होण्याची तयारी सुरू केली आहे. त्या आमदारांच्या पेन्शमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव देण्यात यावा. आज मी अनेकांच्या चेहऱ्यावर अभिनंदनाऐवजी सत्ता गेल्याचे दु:ख पाहिले, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.
दरम्यान यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोठ्या मनाचं व्यक्तीमत्व आहे. त्यांच्यामुळे आज पुन्हा युती झाली. जनतेने 2019 मध्ये भाजप शिवसेनेला स्पष्ट बहुमताने कौल दिला होता. मात्र त्यावेळी शिवसेना काल्पनिक कथानक वाटण्यांसोबत गेली. मात्र पुन्हा एकदा राज्यात युतीचे सरकार आले आहे. ज्या 40 आमदारांनी या कामात मदत केली त्यांचे देखील मी आभार मानतो, असे मुनगंटीवार यांनी यावेळी म्हटले आहे.