‘आपली बेईमानी झाकण्यासाठी गुलाम या शब्दाचा वापर’, मुनगंटीवारांचा संजय राऊतांवर पलटवार

| Updated on: Jun 12, 2021 | 5:42 PM

शिवसेना खासदार संजय राऊतांच्या आरोपाला आता माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

आपली बेईमानी झाकण्यासाठी गुलाम या शब्दाचा वापर, मुनगंटीवारांचा संजय राऊतांवर पलटवार
सुधीर मुनगंटीवार, संजय राऊत
Follow us on

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आणि पर्यायानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर अत्यंत मोठा आणि गंभीर आरोप केलाय. पाच वर्षे आम्ही फडणवीस सरकारमध्ये होतो. पण शिवसेनेला सत्तेत असूनही गुलामासारखी वागणूक मिळत होती, असा धक्कादायक दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊतांच्या या आरोपाला आता माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. खरं तर आपली बेईमानी झाकण्यासाठी गुलाम या शब्दाचा वापर केला जात असल्याचा पलटवार मुनगंटीवार यांनी केलाय. (Sudhir Mungantiwar responds to Sanjay Raut’s statement of slavery)

गुलामाचा स्वाभीमान जागण्यासाठी 5 वर्षे जावी लागली?

खरं तर आपण केलेल्या बेईमानीला झाकण्यासाठी या शब्दाचा वापर केला जातोय. लोकशाहीत कुणी राजा नाही कुणी गुलाम नाही. गुलामाचा स्वाभीमान जागण्यासाठी 5 वर्षे जावी लागली? गुलामासारखी वागणूक दिली तर हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार खुर्चीसाठी गुलामी करतील? हे ऐकलं की अंगावर काटा येतो. या शब्दाचा उपयोग केला जातो हे आश्चर्यजनक आहे. मग 5 वर्षे खिशात असलेले राजीनामे, त्या खिशाला काय चैन होती, चैनला काय मोठं कुलूप होतं? जर तुम्हाला गुलामगिरीची वागणूक दिली गेली होती, तर एका सेकंदात ते राजीनामे तोंडावर फेकून मारायचे. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार इतका कमजोर असू शकतो की, 24 ऑक्टोबर 2019 च्या निकालाची वाट पाहावी लागली गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी? आणि 24 ऑक्टोबर 2019 ला जेव्हा लक्षात आलं की भाजप 105 जागांच्या वर जात नाही तेव्हा यांना आठवण झाली की, 5 वर्षे आम्ही गुलामगिरीत होतो. आता आमच्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडला आहे आणि आता आम्ही राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात जाऊन बसणार, ही त्याची व्याख्या आहे का?

‘एकनाथ शिंदेंनाही मुख्यमंत्र्यांप्रमाणेच खुर्ची होती’

राजकारणात कुणी गुलाम नाही कुणी राजा नाही. मंत्रालयात सातव्या मजल्यावर जिथे आमची बैठक व्हायची, तिथे मुख्यमंत्र्यांसह सर्वांना समान वजनाच्या, समान रंगाच्या, समान आकाराच्या खुर्च्या होत्या. मुख्यमंत्र्यांना जी खुर्ची होती तशीच खुर्ची एकनाथराव शिंदेंनाही होती. त्यामुळे गुलामगिरीची भाषा योग्य नाही. प्रत्येकानं आपल्या खात्यात जीव ओतून काम करायचं होतं. महाराष्ट्राच्या आणि नागरिकांच्या उन्नतीचा, प्रगतीचा विचार करायचा होता, हा महत्वाचा भाग आहे, असा शब्दात मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊतांचा आरोप काय?

राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. पण गेल्या पाच वर्षात शिवसेना संपवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. शिवसेना सत्तेत असतानाही गावोगावी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला गेला. पाच वर्षे सत्तेत होतो. पण सत्तेत असूनही गुलाम होतो. गुलामासारखी वागणूक मिळत होती, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला.

संबंधित बातम्या :

फडणवीसांच्या सरकारमध्ये शिवसेनेला गुलामासारखी वागणूक मिळाली; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

कितीही स्ट्रॅटेजी करा, 2024 मध्ये येणार तर मोदीच, पवार-प्रशांत किशोर भेटीवर फडणवीसांचं भाष्य

BJP leader Sudhir Mungantiwar responds to Sanjay Raut’s statement of slavery