भाजप संबंधित नेत्यांच्या साखर कारखान्यांची 310 कोटींची हमी ठाकरे सरकार रद्द करणार?
फडणवीस सरकारने पंकजा मुंडे, धनंजय महाडिक, विनय कोरे, कल्याणराव काळे या चौघा नेत्यांच्या साखर कारखान्यांना बँक हमी का दिली हे तपासले जाणार आहे.
मुंबई : भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना दिलेली 310 कोटींची बँक हमी रद्द होण्याची शक्यता आहे. भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी खासदार धनंजय महाडिक, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे आणि भाजपचा दरवाजा ठोठावून आलेले काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांच्या साखर कारखान्यांना (BJP Leader Sugar Factory Guarantee) फडणवीस सरकारने दिलेली हमी रद्द होण्याची चिन्हं आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पदभार स्वीकारताच अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. फडणवीस सरकारने गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत घेतलेल्या निर्णयांचा आढावा ठाकरे सरकार घेत आहे. त्यातच फडणवीस सरकारने या चौघा नेत्यांच्या साखर कारखान्यांना बँक हमी का दिली हे तपासले जाणार आहे. राजकीय हेतूने या कारखान्यांना बँक हमी दिल्याचं आढळल्यास बँक हमी रद्द होण्याची शक्यता आहे.
फडणवीसांच्या काळातील 6 महिन्यांच्या फाईल मागवल्या, मुख्यमंत्री ठाकरे अॅक्शनमध्ये!
विधानसभा निवडणुकीच्या आधी बँक हमी आणि खेळत्या भांडवलापोटी या चार नेत्यांच्या कारखान्यांना तत्कालीन सरकारने मदत दिली होती. पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, धनंजय महाडिक यांचा भीमा साखर कारखाना, विनय कोरे यांचा श्री तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना आणि कल्याणराव काळे यांचा सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखाना यांना ही हमी देण्यात आली होती.
कोणाला किती हमी?
पंकजा मुंडे – वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना – 50 कोटी धनंजय महाडिक – भीमा साखर कारखाना – 85 कोटी विनय कोरे – श्री तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना – 100 कोटी कल्याणराव काळे – सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखाना – 75 कोटी
सरकारी हमीमुळे या साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ (एनसीडीसी) मार्फत कर्ज मिळाले असते. या कारखान्यांना कोणत्या निकषावर हमी (BJP Leader Sugar Factory Guarantee) देण्यात आली, हे ठाकरे सरकार पडताळून पाहणार आहे. त्यामुळे या चार नेत्यांच्या बाबतीत काय निर्णय होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसं झाल्यास, आधीच पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा असताना त्यांना आणखी एक धक्का बसू शकतो.