सोलापूर : हे सरकार जेढवे दिवस थांबतील तेवढे दिवस वाट लावतील, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil criticized on government) यांनी महाविकासआघाडी सरकारवर केली आहे. ते सोलापूरमधील एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. “भाजपात एकोपा नसल्याने जवळपास 50 जागा गेल्या. त्यामुळे 12 कोटींचे सरकार हातातून गेले”, असंही चंद्रकांत पाटील (Chandrakant patil criticized on government) यांनी सांगितले.
“सरकारस्थापन करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त 20 जागांची आवश्यकता आहे. 50 जागा अशा आहे जिथे मत विभाजन झाले. अहमदपूरमध्ये सिटिंग आमदार पडला. कारण बंडखोर उमेदवाराने 25 हजार मतं घेतली”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
“शरद पवार पावसात भिजले, ईडीची त्यांना भीती दाखवली. त्यामुळे काही झाले असे नाही, तर आपण एकोप्याने वागलो नाही. त्यामुळे 50 जागा गेल्या 12 कोटींचे सरकार गेले. काळजी करु नका, कारण हे सगळे किती दिवस एकत्र थांबणार आहेत हे तुम्हाला माहित आहे. हा पण जेवढे दिवस थांबतील तेवढे दिवस वाट लावतील”, अशी टीकाही पाटील यांनी महाविकासआघाडी सरकारवर केली.
दरम्यान, विधानसभा निवडणुकानंतर शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडून थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करुन सत्तास्थापन केली. त्यामुळे राज्यातील मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सध्या अनेक बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.