राम मंदिर ते शेतकरी पेन्शन, भाजपच्या जाहीरनाम्यात 75 ‘संकल्प’
नवी दिल्ली : कायद्याच्या चौकटीत राहून राम मंदिर उभारणार ते शेतकऱ्यांना पेन्शन सुरु करणार इथवर, असे एकूण 75 आश्वासनं भाजपने जाहीरनाम्यातून दिली आहेत. ‘संकल्पपत्र’ नावाने भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यासह दिग्गज नेते यावेळी […]
नवी दिल्ली : कायद्याच्या चौकटीत राहून राम मंदिर उभारणार ते शेतकऱ्यांना पेन्शन सुरु करणार इथवर, असे एकूण 75 आश्वासनं भाजपने जाहीरनाम्यातून दिली आहेत. ‘संकल्पपत्र’ नावाने भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यासह दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते.
भाजपच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे :
- स्वतंत्र जल शक्ती मंत्रालयाची स्थापना करणार – मोदी
- ‘वन मिशन, वन डायरेक्शन’ मंत्र स्वीकारुन आम्ही पुढे जात आहोत – मोदी
- राष्ट्रवाद आमची प्रेरणा, सुशासन आमचा मंत्र – मोदी
- तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळेच देशात काम करु शकलो – नरेंद्र मोदी
- 1400 लोकांमागे एक डॉक्टर, असं लक्ष्य
- 75 नवीन मेडिकल कॉलेज आणि पदव्युत्तर कॉलेजांची स्थापना करणार – राजनाथ सिंह
- ‘एक देश, एक निवडणूक’बाबत सर्वांची मंजुरी मिळवण्याचा प्रयत्न करु – राजनाथ सिंह
- व्यवस्थापन संस्था, लॉ कॉलेजमधील जागा वाढवणार, अधिक विद्यार्थ्यांना शिकता येईल – राजनाथ सिंह
- सर्व सरकारी सेवा ऑनलाईन करणार -राजनाथ सिंह
- कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांच्या जागांमध्ये वाढ – राजनाथ सिंह
- गरीबांसाठी गॅस एलपीजी सुविधा देणार – राजनाथ सिंह
- सर्व जमीन रेकॉर्ड डिजीटल करणार – राजनाथ सिंह
- दहशतवाद्यांसाठी झिरो टॉलेरन्स पॉलिसी – राजनाथ सिंह
- राम मंदिराबाबत सर्व शक्यता पडताळणार – राजनाथ सिंह
- छोट्या व्यापाऱ्यांनाही पेन्शन योजना लागू करणार – राजनाथ सिंह
- व्यापाऱ्यांसाठी राष्ट्रीय व्यापार आयोग बनवू – राजनाथ सिंह
- सर्व शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये मिळणार- राजनाथ सिंह
- शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करणार – राजनाथ सिंह
- क्रेडिट कार्डवरील एक लाखापर्यंत जे कर्ज मिळतं, त्यावर 5 वर्षांपर्यंत व्याज आकारला जाणार नाही – राजनाथ सिंह
- मोदी सरकारच्या काळात जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण केली – राजनाथ सिंह
- मोदी सरकारने जगात भारताचा मान-सन्मान वाढवला – राजनाथ सिंह
- 130 कोटी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारं हे संकल्पपत्र आहे – राजनाथ सिंह
- 300 रथ आणि 7700 मतपेट्यांच्या माध्यमातून संकल्पपत्र तयार केलंय – राजनाथ सिंह
- आम्ही लोकांच्या सहभागाचं सरकार चालवत आहोत – राजनाथ सिंह
- भाजपच्या संकल्पपत्रात 75 संकल्प
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचं प्रकाशन
- मोदींना पुन्हा एकदा आशीर्वाद द्या, आम्ही निर्णायक सरकार देऊ – अमित शाह
- भाजपने 6 कोटी लोकांशी चर्चा करुन संकल्पपत्र बनवलं आहे – अमित शाह
- नरेंद्र मोदींनी देशातील निराशेला आशेत परावर्तीत केलं – अमित शाह
- भारत जगात महाशक्ती अशी ओळख बनवत आहे – अमित शाह
- देशाची अर्थव्यवस्था जगात 11 व्या स्थानावरुन 6 व्या स्थानावर आली – अमित शाह
- देशाच्या अर्थव्यवस्थेची दखल जगाला घ्यावी लागली, असे मोदींनी काम केले आहे – अमित शाह
- देशातील बहुतांश घरात वीज पोहोचली आहे – अमित शाह
- भाजपची सत्ता देशाच्या इतिहासात सुवर्णकाळ म्हणून लिहिला जाईल – अमित शाह
- देशात 30 वर्षांनंतर पहिल्यांदा अस्थिरता संपली आणि बहुमताने भाजप सरकार स्थापन झालं – अमित शाह
- भाजपाध्यक्ष अमित शाह यांचं भाषण सुरु
- भाजप कार्यालयात नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थित
- संकल्पपत्रात नवीन काय याबाबत सर्वांना उत्सुकता
- थोड्याच वेळात भाजपचा जाहीरनामा सादर होणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या जाहीरनाम्यात शेतकरी आणि तरुण वर्गासाठी काही महत्त्वपूर्ण गोष्टींची तरतूद करण्यात येणार आहे. तसेच या संकल्पपत्रात रोजगार निर्मितीबाबत पावलं उचलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर या जाहीरनाम्यात तरतूद करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या गोष्टींचा भाजपच्या जाहीरनाम्यात समावेशाची शक्यता :
- शेतकऱ्यांसाठी मासिक पेन्शन योजना सुरु करणे
- रोजगार आणि स्वंयरोजगार जास्तीत जास्त संधी निर्माण करणे
- पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा विस्तार
- गरीब सवर्णांना 10 टक्के आरक्षणाचा मुद्दा
- देशाच्या सुरक्षेबाबत काही महत्तपूर्ण तरतुद
- मंत्रिमंडळात महिलांना 15 टक्के आरक्षण
- महिला आणि विद्यार्थ्यांसाठी काही मोठ्या घोषणा
भाजपचा जाहीरनामा देशभरातील सर्वसामान्य व्यक्तींनी दिलेल्या सूचनांद्वारे तयार करण्यात आला आहे. यासाठी भाजपने एका मोहिमेचे आयोजन केलं होतं. त्यात देशभरातील अनेकांनी सूचना दिल्या होत्या. विशेष म्हणजे बिहारमधून जवळपास दीड लाखापेक्षा जास्त लोकांनी यात आपले विचार मांडले होते. दरम्यान भाजपद्वारे प्रसिद्ध होणाऱ्या जाहीरनाम्यात राम मंदिर, 370 कलम रद्द करण, आणि समान नागरी संहिता रद्द करण्यासंदर्भात उल्लेख असण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात काँग्रेसने येत्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरानामा प्रसिद्ध केला. जन आवाज असे या जाहीरनाम्याचे नाव असून यात रोजगार, आरोग्य, शिक्षण, शेतकऱ्यांसह न्याय योजनांचा समावेश आहे. त्याशिवाय यावेळी राहुल गांधीनी राजद्रोहाचा गुन्हा ठरवणारे भारतीय दंड संहितेतील कलम १२४ अ रद्द करण्यात येईल अशीही घोषणा करण्यात आली होती. तसेच प्रत्येकाला दरवर्षी 72 हजार रुपये देण्यात येतील ही महत्त्वपूर्ण घोषणाही राहुल गांधी यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या जाहीरनाम्यात कोण-कोणत्या महत्त्वपूर्ण गोष्टींचा समावेश असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
निवडणुकीच्या तारखा जाहीर
केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.
महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.