खडसेंनी दावे फेटाळताच महाजन म्हणाले, माझ्याकडे नाथाभाऊंची क्लिप; काय आहे प्रकरण?
भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याबाबत एक विधान केलं. त्यावरून आता महाजन-खडसे आमनेसामने आलेत....
गौतम बैसाने, TV9 मराठी, प्रतिनिधी, धुळे : भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याबाबत एक विधान केलं. ‘मिटवण्याच्या’ मुद्द्यावर त्यांनी भाष्य केलंय. त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यावर खडसेंनी प्रत्युत्तर देत महाजनांचे दावे खोडून काढले. खडसेंच्या उत्तरावर आता गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा आता त्यावर प्रत्त्युत्तर दिलंय. खडसेंनी फडणवीसांच्या कानात काय सांगितलं याची क्लिप आपल्याकडे उपलब्ध असल्याचं महाजन (Girish Mahajan) म्हणालेत.
खडसेंना इशारा
अधिक बोलायला लावू नये, असं म्हणत महाजनांनी खडसेंना इशारा दिलाय. देवेंद्र फडणवीस आणि माझ्या कानात काय सांगितलं याची क्लिप उपलब्ध आहे. त्याचं रेकॉर्डिंग उपलब्ध आहे, असं महाजन म्हणालेत.
महाजनांचा दावा काय?
गिरीश महाजन यांनी खडसेंबाबत एक विधान केलंय. मी आणि देवेंद्र फडणवीस बसलो होतो.तिथे एकनाथ खडसे आले आणि त्यांनी म्हटलं की आपण तिघं बसू. जे काही आहे ते सगळं मिटवून घेऊ… आम्ही बसलो तिथे खूप गर्दी होती. त्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय आहे? हे स्पष्टपणे कळू शकलं नाही. तिथं त्यांना विचारता आलं नाही की नेमकं काय मिटवायचंय ते”, असा दावा महाजनांनी केला.
खडसेंचं उत्तर
महाजनांच्या दाव्यावर खडसेंनी उत्तर दिलंय. त्या दिवशी बोलताना मिटून टाका, मी असं काही बोललोच नाही, असं खडसे म्हणालेत. आता मिटवायचं राहिलंय तरी काय? सर्वप्रकारे तर त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. ईडीची चौकशी सुरू आहे. सीबीआय चौकशी सुरू आहे. या सर्व चौकशींना मी समर्थपणे सामोरं जाणार आहे, असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.