Raosaheb Danve | शिवसेना प्रमुख कोण? रावसाहेब दानवे म्हणतात जिसकी जितनी संख्या भारी…!
युतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे. ज्यांचे जास्त लोक निवडून येतात, त्यांचा मुख्यमंत्री होईल, हे त्या दिवशी ठरलं होतं... पण उद्धव ठाकरेंनी दुसरेच मुद्दे मांडले, असाही आरोप रावसाहेब दानवे यांनी केला.
नवी दिल्लीः एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) गेलेल्या आमदार आणि खासदारांनी बंड केलेलं नाही तर उठाव केला आहे. आता शिवसेना प्रमुख (Shivsena President) कोण आहेत? तर जास्तीत जास्त शिवसेना नेत्यांचं नेतृत्व कोण आहे, हे बघावं लागेल. त्यामुळे जिसकी जितनी संख्या भारी… उसकी उतनी भागीदारी असं म्हणता येईल. म्हणून एकनाथ शिंदे हेच सध्या शिवसेनेचे प्रमुख आहेत, असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपशी युती न करणं हे जनतेलाच नव्हे तर आमदार आणि खासदारांनाही पसंत नव्हतं. पण शिवसेनेने सत्तेसाठी भाजपला फसवल्याचा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची त्यावेळी बैठक झाली तेव्हा मी स्वतः महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो, तेव्हा काय घडलं हे मला माहिती आहे, असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी त्यावेळचा प्रसंगही सांगितला. नवी दिल्लीत आज रावसाहेब दानवे यांनी टीव्ही 9 शी बातचित केली.
‘त्यांच्याच गुणांनी सरकार पडलं…’
शिवसेना- काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार भाजप पाडेल, असा आरोप केला जात होता. मात्र त्यांच्याच गुणांनी सरकार पडलं, असा खोचक टोला दानवेंनी लगावला. ते म्हणाले, ‘ विधानसभेतलं आमदारांचं भाषण बघितलं तर एका मुद्द्यावर एकवाक्यता आहे. बंड नाही केलं उठाव केला. आम्हीच शिवसैनिक आहोत. आम्ही फुटलो, बंडखोरी केली, हे चुकीचं आहे. सेनेचे आणि भारतीय जनता पार्टीचे एक विचार आहेत. विचारावर आधारीत ती युती होती. ती युती 25 वर्ष राहिली. ही युती असताना आम्ही लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका लढलो. लोकांनी युतीला कल दिला. बहुमत दिलं. असं असतानाही शिवसेनेनं दगा फटका केला. आमदारांचं म्हणणं ऐकलं नाही. मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपायी काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती केली. जनता आणि आमदार, खासदारांनाही ही युती पसंत नव्हती. केव्हातरी हा स्फोट होणार होता. पहिल्या दिवसापासून भाजप आमचं सरकार पाडणार आहोत, असं हे म्हणत होते. पण यांच्याच गुणानं हे सरकार पाडणार, असं आम्ही म्हणत होतो…
आम्हीच पाठिंबा दिला, त्यांचा मुख्यमंत्री केला…
एकनाथ शिंदेंच्या गटाने भाजपला पाठिंबा दिलाच नाही तर आम्हीच त्यांना पाठिंबा दिला, असा दावा करताना रावसाहेब दानवे म्हणाले, ‘ शिवसेनेचं नेतृत्व कुणाचं आहे? जितनी जिसकी संख्या भारी… उतनी उसकी भागीदारी… संख्या कोणाकडे आहेत… 18 पैकी 12 खासदार शिंदेंकडे… 55 पैकी 40 आमदार शिंदेंकडे आहे. शिवसेना कोण आहे, शिवसेना प्रमुख कोण आहे… दावा केला नाही, पण नेता तोच आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं काहीही असू द्या. भाजपचा यांच्या फुटीशी काहीही संबंध नाही. हे फुटले आणि यांनी आम्हाला पाठिंबा दिला असंही नाही. उलट आम्हीच त्यांना पाठिंबा दिला. त्यांचाच मुख्यमंत्री केला.
युतीच्या त्या बैठकीत काय झालं…?
काल शिवसेनेचे लोकसभा खासदार राहुल शेवाळेंनी युतीच्या चर्चेबाबत मोठं वक्तव्य केलं. त्याविषयी अधिक सविस्तर सांगताना रावसाहेब दानवे म्हणाले, ‘ मी त्यावेळेला महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो. अमितभाईंचा फोन आला. शिवसेनेशी युतीची चर्चा करायची. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा, मी आणि इतर नेते. आम्ही मुंबईत आलो आणि मुद्दे ठरवून शिवसेनेत गेलो. त्यांचेही काही नेते होते. बसल्यानंतर उद्धव ठाकरे एका खोलीत अमितभाईंना भेटले. उद्धव ठाकरे बाहेर आले आणि पत्रकार परिषद घेतली. प्रेसमध्ये फक्त भाजप किती जागा लढेल, शिवसेना किती जागा लढेल… हे सांगितलं. आम्ही सह्याद्री गेस्ट हाऊसला गेल्यावर.. अमितभाईंनी मुख्यमंत्री पदाचा विषय काढला. युतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे. ज्यांचे जास्त लोक निवडून येतात, त्यांचा मुख्यमंत्री होईल, हे त्या दिवशी ठरलं होतं… पण उद्धव ठाकरेंनी दुसरेच मुद्दे मांडले….