नागपूर : विदर्भात भाजपचे मिशन ओबीसी सुरु झाल्याचे दिसत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ विदर्भातील बडे नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या गळ्यात पडल्यानंतर भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसच्या त्रिकूटाची भाजपने धास्ती घेतल्याचं चित्र आहे. (BJP Mission OBC in Vidarbha fearing Congress Leaders)
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भूकंप आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि विधानपरिषद आमदार अभिजीत वंजारी या विदर्भातील काँग्रेसच्या दिग्गजांचा भाजपने धसका घेतल्याचं बोललं जात आहे. विदर्भात भाजपचे मिशन ओबीसी सुरु झाले आहे. ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींशी संपर्क करण्याचे अभियान भाजपने सुरु केले आहे.
छोट्या जातींसाठी कार्यकारिणीत आरक्षण ठेवण्यात आले आहे. भाजपच्या ओबीसी मोर्चाला अधिक सक्रिय करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. ओबीसी समाजाला पक्षासोबत जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपचा ओबीसी चेहरा चंद्रशेखर बावनकुळे यांनाही पक्षात अधिक सक्रिय केलं जात आहे.
कोण आहेत नाना पटोले?
नाना पटोले यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोलेंनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतली. नाना पटोले भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले आहेत. 2014 ते 2017 या कालावधीत त्यांनी भाजपच्या तिकीटावर खासदारकी भूषवली. (BJP Mission OBC in Vidarbha fearing Congress Leaders)
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात भाजप सरकार अपयशी ठरत आहे, असं सांगत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाना पटोलेंनी हल्लाबोल चढवला होता. 2017 मध्ये नाना पटोलेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि पुन्हा काँग्रेसच्या गोटात सहभागी झाले.
अभिजीत वंजारी हे विधानपरिषदेवरील नागपूर पदवीधर मतदार संघातून विजयी झाले आहेत. वंजारी हे नागपूर पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर महाविकास आघाडीतर्फे रिंगणात उतरले होते. अभिजीत वंजारी हे विदर्भातील काँग्रेसचे निष्ठावान नेते मानले जातात.
संबंधित बातम्या :
(BJP Mission OBC in Vidarbha fearing Congress Leaders)