सत्तास्थापनेसाठी भाजप सरकारी यंत्रणेचा वापर करतंय : संजय राऊत
भाजप साम, दंड, भेद वापरून सत्तेसाठी सरकारी यंत्रणांचा वापर (Misuse of Government institutions) करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबई: भाजप आणि शिवसेनेतील सत्तासंघर्ष (BJP Shivsena Dispute on Government Formation) शिगेला पोहचला आहे. भाजपकडून सत्तेसाठी विरोधकांना लक्ष्य करून संपवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. भाजप साम, दंड, भेद वापरून सत्तेसाठी सरकारी यंत्रणांचा वापर (Misuse of Government institutions) करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
भाजपने राष्ट्रवादीचे 45 जण अशाचप्रकारे साम, दाम, दंड, भेद वापरूनच फोडले. त्यामुळे संजय राऊत यांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचं मत काँग्रेसचे नेते राजन भोसले यांनी व्यक्त केलं आहे. सत्तेवरून शिवसेना भाजपमधील संघर्ष शिगेला पोहचला आहे. त्यामुळे युती होईल की नाही याबाबतची शंका राजकिय विश्लेषकही व्यक्त करत आहेत.
शिवसेना-भाजप युतीमध्ये मुख्यमंत्री पद आणि सत्तेतील समसमान वाटा या मुद्द्यांनी तणाव वाढला आहे. या संघर्षामुळे संजय राऊत यांनी राजकीय गौप्यस्फोट केला आहे. भाजपच्या मित्रपक्षानेच त्यांच्यावर सत्तास्थापनेसाठी साम-दाम-दंड-भेदासह सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे राजकीय खळबळ निर्माण झाली आहे. आता भाजपची मोठी कोंडी झाली आहे.
यावर भाजपचे आमदार राम कदम म्हणाले, “महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला कौल दिला. त्याचा सन्मान करावा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी खात्री आहे. शिवसेना आमचा मित्र पक्ष आहे. देवेंद्र फडणवीस हीच सर्वांची पसंती आहे. राजकारणात सर्वच राजकीय पक्षांना महत्वकांक्षा असणे गैर नाही. आमच्याकडे आकडे आहे. कॅमेरा समोर सांगणे योग्य नाही. येत्या 2-3 दिवसात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री दिसतील.
विशेष म्हणजे सत्तेतील वाट्यासाठी भांडणाऱ्या भाजप-शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी आता ओला दुष्काळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरा करण्याकडे मोर्चा वळवला आहे. सत्तासंघर्षात भाजप-शिवसेना जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याची जनभावना तयार झाल्यामुळेच हे दौरे होत असल्याचाही आरोप होत आहे.
आता सत्ता स्थापनेसाठी भाजप कोणत्या कुरघोडी करणार आणि शिवसेना आपल्या भूमिकेतून भाजपवर किती दबावतंत्र वापरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.