Monsoon Session:”शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांनाच दोन माईक? आवाज दुसरीकडे कुठे रेकॉर्ड होतोय का?”, शेलारांकडून शंका उपस्थित
Ashish Shelar: आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केलाय.
मुंबई : भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केलाय. विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या समोर ठेवण्यात आलेल्या दोन माईकवर त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय. या तिघांपुढे दोन माईक का आहेत? या माईकचा आवाज कुठे जातो. या तिघांचा आवाज कुठे दुसरीकडे रेकॉर्ड होतोय का, याची चौकशी करावी, अशी मागणी शेलारांनी केली आहे. सध्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आज या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवर चर्चा होतेय. अश्यात आता सभागृहातील तीन नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चिला जातोय.
या सगळ्यावर अजित पवार यांनीही उत्तर दिलंय. आमचा आवाज दिल्लीला जातो आमचं पण दिल्लीला ऑफिस आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. आशिष शेलार यांनी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासमोर दोन माईक असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावरून सभागृहात चर्चा झाली. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केलं. आधी सूरत मग गुवाहाटी नंतर गोवा अन् मग ते महाराष्ट्रात आले. त्यांच्या बंडाचं केंद्र गुवाहाटी होतं. गुवाहाटीतील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये महाराष्ट्राच्या सत्तेची गणितं आखली गेली. त्याचाच धागा धरत विरोधकांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केलाय.विधानसभेचं कामकाज सुरु होण्याआधी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं. सरकारवर हल्लाबोल केला. सरकार विरोधात घोषणाबाजी केली. शिंदेगटाच्या बंडाचं केंद्र असलेल्या गुवाहाटीचा संदर्भ देत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घोषणा दिल्या. “गद्दारांना भाजपची ताट वाटी, चलो गुवाहाटी,चलो गुवाहाटी!”, या घोषणेने सर्वाचंच लक्ष वेधलं आहे.