मुंबई : कोरोना नियमावलीवरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार रविंद्र फाटक, ठाणे महानगरपालिकेचे काही नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबियांनी कोरोना लस घेतल्याचं कळतंय. हा प्रकार अत्यंत संतापजनक असून, पूर्णत: बेकायदेशीर आहे. यातून शिवसेनेची मानसिकता काय आहे? याचा हा ढळढळीत पुरावा असल्याली घणाघाती टीका भातखळकर यांनी केलीय. बेकायदेशीरपणे लस घेतल्याप्रकरणी नरेश म्हस्के आणि रविंद्र फाटक यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी भाजपनं केली आहे.(Atul Bhatkhalkar criticizes CM Uddhav Thackeray)
मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचे नियम पाळण्यासाठी संपूर्ण राज्याला उपदेशाचे डोस पाजले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी एका तरुणीच्या कथित आत्महत्या प्रकरणात नाव असलेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी 10 हजारांपेक्षा जास्त लोक एकत्र जमवून कोरोनासाठी खुले निमंत्रण दिले. तर दुसरीकडे कोरोना योद्धयांचे लसीकरण अद्याप पूर्ण झाले नसताना, तसेच वरिष्ठ नागरिक, बालक यांना अगोदर लस देण्याची आवश्यकता असताना, शिवसेनेच्या नेत्यांनी स्वतःला लसीकरण करून घेतले आहे. यातून शिवसेनेची स्वार्थी प्रवृत्ती दिसून येते, असा हल्लाबोल भातखलकरांनी केलाय.
गोरगरीब, ज्येष्ठ नागरिक अशा अनेक गरजूना मागे सारून, नियम धाब्यावर बसवून शिवसेनेचे ठाण्याचे महापौर आणि आमदार रवी फाटक ब त्यांच्या कुटुंबीयांनी कोरोनाची लस घेतली. रांगेतली ही घुसखोरी शिवसेनेची आपमतलबी राजकीय संस्कृती दाखवणारी घटना आहे. pic.twitter.com/TYmq4r0uff
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 25, 2021
देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असूनही कोरोनाविरोधातील लसीकरण कार्यक्रमात महाराष्ट्र मागे का आहे, हेच यातून स्पष्ट होते. यातही धक्कादायक बाब म्हणजे ज्या पोहरादेवी येथे संजय राठोड यांनी निर्लज्जपणे प्रदर्शन मांडलं, त्या पोहरादेवीच्या महतांनाच आता कोरोना झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्याला उपदेशाचे डोस देण्यापेक्षा आपल्या पक्षातील नेत्यांना आधी कोरोनाचे नियम शिकवावे, असा टोलाही त्यांनी लगावलाय. कायम दातखिळी बसल्यासारखे गप्प बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी याविषयी त्यांचे काय मत आहे, याचा सुद्धा खुलासा करावा, अशी खोचक मागणी आमदार भातखळकर यांनी केली आहे.
बेकायदेशीरपणे स्वतःला लसीकरण करून घेणारे ठाण्याचे महापौर, आमदार रवींद्र फाटक आणि इतर नगरसेवक तसेच वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गर्दी जमविल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा, अन्यथा भारतीय जनता पार्टी या विरोधात आंदोलन करेल, असा इशाराही भातखळकरांनी दिलाय.
संबंधित बातम्या :
Atul Bhatkhalkar criticizes CM Uddhav Thackeray