Jaykumar Gore यांच्या गाडीला भीषण अपघात, रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार, मेडिकल बुलेटिन जारी…
जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात...
![Jaykumar Gore यांच्या गाडीला भीषण अपघात, रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार, मेडिकल बुलेटिन जारी... Jaykumar Gore यांच्या गाडीला भीषण अपघात, रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार, मेडिकल बुलेटिन जारी...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/12/24150618/Jaykumar-Gore-1.jpg?w=1280)
पुणे : भाजपचे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore Car Accident) यांच्या गाडीला भीषण अपघात झालाय. या अपघातात जयकुमार गोरे यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना आता पुण्यातील रुबी रुग्णालयात (Ruby Hospital) आणण्यात आलं आहे. जयकुमार गोरे यांची प्रकृती सध्या कशी आहे? याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
जयकुमार गोरे यांच्या प्रकृतीबाबत रुबी हॉस्पिटलच्या डॉक्टर कपील यांनी माहिती दिली. जयकुमार गोरे यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांना दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार केले जात आहेत. ते शुद्धीवर आहेत. उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. लवकरच ते यातून बरे होतील, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
आमदार जयकुमार गोरे साताऱ्याहून आपल्या मतदारसंघाकडे म्हणजेच माण-खटावच्या दिशेने येत असताना त्यांची फॉर्च्युनर गाडी 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली. आज पहाटे 3.30 वाजता साताऱ्यातील फलटण येथील मलठण येथे हा भीषण अपघात झाला.
चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची कार खोल खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातात जयकुमार गोरे यांना गंभीर दुखापत झाली आहे.
जयकुमार गोरे यांच्या छातीला, पाठीला आणि हाताला दुखापत झाली आहे. त्यांना आधी साताऱ्यातील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात हलवण्यात आलं.
विशेष अॅम्ब्युलन्समधून त्यांना पुण्यात आणण्यात आलं. रुबी रुग्णालयातील एमर्जन्सी वॉर्डमध्ये त्यांना दाखल करण्यात आलंय. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
गोरे यांची कार 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातातून जयकुमार गोरे थोडक्यात बचावले. गोरे यांच्यासह चारजण जखमी झाले आहेत.
आमदार गोरे यांचे स्विय साहाय्यक रुपेश साळुंके यांची प्रकृती गंभीर आहे. रुपेश साळुंके यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. सध्या रुपेश साळुंके बारामतीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांनाही रुबी हॉस्पिटलला आणण्यात येत आहे.