प्रशांत बंब यांच्या विरोधात शिक्षकांची मोर्चाची घोषणा, बंब म्हणतात…
Prashant Bamb :आमदार प्रशांत बंब आणि शिक्षकांमधील संघर्ष आता चांगलाच पेटलाय. शिक्षकांनी प्रशांत बंब यांच्या विरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे.
औरंगाबाद : भाजप आमदार प्रशांत बंब (BJP MLA Prashant Bamb) आणि शिक्षकांमधील संघर्ष आता चांगलाच पेटलाय. शिक्षकांनी प्रशांत बंब यांच्या विरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे. उद्या हा मोर्चा काढला जाणार आहे. याबाबत प्रशांत बंब यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी शिक्षकांच्या मोर्चावर आपली प्रतिक्रिया दिली. “हा माझ्या नव्हे तर संबंध पालकांच्या आणि जनतेच्या विरोधातील मोर्चा आहे”, असं प्रशांत बंब (Prashant Bamb) म्हणाले.
प्रशांत बंब आणि शिक्षकांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. काही दिवसांआधी प्रशांत बंब यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर शिक्षकांनी त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली.
शिक्षकदिनी सन्मान
5 सप्टेंबरला शिक्षकदिनी प्रशांत बंब यांनी शिक्षकांचा सत्कार केला आहे. आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांचं पूजन केलं. औरंगाबादच्या बजाजनगरमध्य राहणाऱ्या शिक्षिकेचं त्यांनी पूजन केलं आहे. दीपाली भगवान मकरंद असं या शिक्षिकेचे नाव आहे. शाल आणि श्रीफळ देऊन त्यांनी हा सत्कार केलाय. हात जोडत त्यांनी शिक्षकांच्या कार्यप्रति आदर व्यक्त केला.
राज्यातील 70 टक्के शिक्षक आपल्या मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता ढासळत आहे. मुख्यालयी राहण्याचं आम्हाला बंधन नाही, असं शिक्षकांचं म्हणणं आहे. त्यांना कुठेही राहून घर भाडं भत्ता मिळत आहे. प्रत्येक गावात जाऊन शिक्षकांची घरे पाहिली. तिथे शिक्षक राहत नव्हते. 90 टक्के शिक्षक त्याच गावात राहत नव्हते. शिक्षक हे धादांत खोटे बोलत आहेत, असा आरोप बंब यांनी केला होता.
आता हा वाद आणखीच वाढण्याची शक्यता आहे. कारण शिक्षकांनी बंब यांच्याविरोधात आंदोलन छेडलं आहे.